आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Guard Suspended In Aurangabad Bamu University

विद्यापीठाच्या ओएसडीवर हल्ल्याचा प्रयत्न; बडतर्फ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील युनिव्हर्सिटी-इंडस्ट्री इंटरॅक्शन सेलचे ओएसडी निवृत्ती गजभरे यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या तीन सुरक्षा रक्षकांना बडतर्फ करण्यात आले आहे. शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) रात्री साडेआठच्या सुमारास केमिकल टेक्नॉलॉजी विभागासमोर सुरक्षा रक्षकांनी ओएसडीला धक्काबुकी करून हल्ल्याचा प्रयत्न केला.

इंडियन सिक्युरिटी फोर्सेसच्या सुरक्षा रक्षकांवर विद्यापीठाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे. मात्र, त्यांच्याकडूनच अधिकाऱ्यांवर हल्ला होण्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. युनिव्हर्सिटी-इंडस्ट्री इंटरॅक्शन समिट-२०१५ निमित्ताने गजभरे व्यग्र आहेत.
विद्यापीठात रात्री उशिरापर्यंत त्यांना काम करावे लागत आहे. शुक्रवारी रात्री ८.३० वा. कारने ते यूडीसीटी समोर थांबले होते. युनिफॉर्ममधील सुरक्षा रक्षकांसोबत एक जण साध्या वेशात होता. त्यांनी गजभरे यांच्याशी दारूच्या नशेत वादास सुरुवात केली. या संदर्भात गजभरे म्हणाले, ‘सुरुवात साध्या गणवेशातील व्यक्तीने केली. तिघांनीही आपल्याला अश्लील शिवीगाळ केली. आयएसएफच्या युनिफॉर्ममधील सुरक्षा रक्षकही या प्रकारामध्ये पूर्णपणे सहभागी होता.

माझ्या माहितीप्रमाणे सर्वांनी प्रचंड दारू प्यायलेली होती. सिव्हिल ड्रेसमधील व्यक्तीचे मात्र संतुलन बिघडलेले होते. मला गाडीबाहेर काढून मारण्याचा त्यांचा उद्देश होता. मात्र, धोका ओळखल्यामुळे लवकरच तेथून निघून गेल्यामुळे पुढील प्रकार टळला.

विद्यापीठातून हटवले
कुलसचिवांनीआयएसएफचे प्रमुख लेखराज सिंह यांना घडला प्रकार सांगून तिघांनाही विद्यापीठाच्या सुरक्षा कामातून मुक्त करण्यास सांगितले. त्यानुसार रसायनशास्त्र विभागात रक्षक म्हणून कार्यरत राजू गायकवाड, यूडीसीटीचे सुरक्षा रक्षक एल. के. आचारी आणि दीनदयाळ उपाध्याय कुशल केंद्राच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले के. एम. शेजूळ यांच्यावर पोलिस कारवाई करण्याऐवजी त्यांना विद्यापीठाच्या सेवेतून कार्यमुक्त करण्याचे डॉ. शिरसाट यांनी सुचवले आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.