आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता औरंगाबादमध्येही 3 नवजात बालकांचा मृत्यू; 9 तासांनी सांगितले हे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीन मातांपैकी एकीची प्रकृती गंभीर... - Divya Marathi
तीन मातांपैकी एकीची प्रकृती गंभीर...
औरंगाबाद- घाटीतील प्रसूती विभागात रविवारी रात्री प्रसूत झालेल्या तीन बाळांचा जन्मताच मृत्यू झाला. या तिन्ही तान्हुल्यांंवर बेगमपुरा स्मशानभूमीत सोमवारी सकाळी सहा वाजता एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ही विदारक घटना पाहून रोज सरणाची व्यवस्था करणाऱ्या स्मशानजोगीच्याही डोळ्यात पाणी आले. यातील दोन मातांची प्रकृती आता सुधारली असून एक अजूनही गंभीर आहे. 

रविवारी मृत्युमुखी पडलेल्या तीन बालकांत दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. माया मुकेश मगरे (३०, रा. ब्रिजवाडी), पूजा पांडुरंग बखले (रा. डोंगरगाव, ता. अंबड), अर्चना विनायक मुंढे (३०, रा. धावणी मोहल्ला) अशी मृत्युमुखी पडलेल्या नवजात शिशूंच्या आईची नावे आहेत. विनायक मुंढे (३६) त्याची पत्नी अर्चना हिला रविवारी सातच्या सुमारास अचानक कळा येऊ लागल्या. त्याने तिला तत्काळ घाटीतील प्रसूती विभागात दाखल केले. सात वाजून ४० मिनिटांनी अर्चना प्रसूत झाली. मात्र मुलगा झाला आहे की मुलगी हे त्याला कोणीच सांगितले नाही. पुरुषांना प्रसूती विभागात प्रवेश नसल्यामुळे त्याला बाहेरच थांबावे लागले. अखेर सकाळी सहा वाजता विनायकच्या हातात मृत बाळ ठेवण्यात आले. माझ्या बाळाचा मृत्यू कशामुळे झाला? असे तो घाटीतील कर्मचाऱ्यांना विचारत होता. मात्र डॉक्टरांना येऊ द्या, तेच काय ते सांगतील, असे उत्तर त्यांना कर्मचाऱ्यांनी दिले. ही घटना पत्रकारांना कळताच त्यांनी घाटीत धाव घेतली. मात्र त्यांनाही प्रथम माहिती देण्यास टाळाटाळ झाली. दुपारी साडेतीन वाजता डॉक्टरांना गाठून पत्रकारांनी या तिन्ही बाळांच्या मृत्यूचे कारण विचारले असता त्यांनी कारण सांगितले. अखेर चारच्या सुमारास विनायकला पत्रकारांकडून त्यांच्या बाळाच्या मृत्यूचे कारण कळाले आणि त्याने आश्रूला वाट करून दिली. 

पाच वर्षांपूर्वी घाटीत अशाच प्रकारे त्याच्या पहिल्या मुलीचा मृत्यू झाला होता. ती केवळ १५ मिनिटे जगली होती. त्यानंतर दुसरी मुलगी झाली ती सध्या चार वर्षांची आहे.  

रोज किमान ५० प्रसूती
घाटीत रोज किमान ५० प्रसूती होतात. कधी कधी हा अाकडा ७० पर्यंत जातो. त्यापैकी रोज किमान एक ते दोन बाळांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू होतो. या महिन्यात १२ बाळांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मागील वर्षी घाटीत १८ हजार बालकांचा जन्म झाला. मृत्युदर कमी व्हावा याकरिता या विभागातील वरिष्ठ डॉक्टर प्रयत्न करत असून अनेक उपाययोजना सुरू आहेत.
 
अधीक्षकांना कल्पना नाही 
घाटीचेवैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी यांना या घटनेची कल्पनाही नव्हती. मला तत्काळ बैठकीला जायचे असून याची माहिती मी देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांना विचारले असता डॉक्टरांनी बाळांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. प्रसूत मातांना योग्य वेळेत घाटीत आणले असते आणि योग्य उपचार मिळाला असता तर बाळांना वाचवता आले असते, असे त्या म्हणाल्या. 

तिन्ही प्रसूती सामान्य 
अर्चनामुंढे या महिलेच्या बाळाचा पोटातच गुदमरल्याने मृत्यू झाला. बाळाची पूर्ण वाढ झाली नव्हती. रिजवाडीतील माया पवार हिला रविवारी रात्री नऊ वाजता घाटीत दाखल केले. पहाटे सव्वातीनच्या सुमारास प्रसूती झाली. तिची मुलगी पोटातच मरण पावली होती. पूजा बकले हिला झटके आल्यामुळे तिचा रक्तदाब कमी-जास्त झाला आणि गर्भाताच मुलगी मरण पावली. या तिन्ही प्रकरणातील प्रसूती नॉर्मल झाल्या. 
बातम्या आणखी आहेत...