आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Pipe Connection Cut Issue At Aurangabad, Divya Marathi

‘सुभेदारी’तील नळ कनेक्शन कापले; व्हीव्हीआयपींना विहिरीचे पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सुभेदारी विश्रामगृहात थांबणे प्रतिष्ठेचे मानले जाते. परंतु मागील तीन महिन्यांपासून हीच प्रतिष्ठा व्हीव्हीआयपींच्या जिवाशी खेळण्यासारखी झाली आहे. मार्च महिन्यात मनपाने नळ कापल्यानंतर थकबाकी भरण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाने वापरास व पिण्यास योग्य नसलेल्या विहिरीचे पाणी वापरून बनवेगिरी करण्याचा प्रयत्नकेल्याचा प्रकार समोर आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली निझामकालीन सुभेदारी विश्रामगृह आहे. मेन बिल्डिंग, अजिंठा आणि वेरूळ अशा तीन इमारती मिळून 45 कक्ष आहेत. मेन बिल्डिंगमध्ये केंद्रीय, राज्यातील मंत्र्यांसह सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या राहण्याची व्यवस्था आहे. तर अजिंठा इमारतीमध्ये बारा एसी कक्ष असून सचिव दर्जाच्या अधिकार्‍यांच्या राहण्याची व्यवस्था आहे. वेरूळ नावाच्या तीनमजली इमारतीमध्ये सर्वाधिक 24 कक्ष असून सर्वसामान्य अधिकारी व इतर राजकीय नेत्यांच्या राहण्याची व्यवस्था येथील कक्षात केली जाते. विश्रामगृहाच्या आवारात महापालिकेचे तीन कनेक्शन आहेत. सा.बां. ने मार्च महिन्यात मनपास 2 लाख 96 हजार रुपये भरल्यानंतरही त्यांच्याकडे दहा लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी न भरल्यामुळे पालिकेने मार्च महिन्यात विश्रामगृहाचे पाणी बंद केले. सा.बां. ने थकबाकी भरण्याऐवजी पर्याय शोधला. विश्रामगृहाच्या आवारात असलेल्या जुन्या विहिरीच्या पाण्याचे परीक्षण न करताच ते पाणी थेट कक्ष आणि पिण्यासाठी असलेल्या वॉटर कूलरमध्ये भरले. विश्रामगृहातील वॉटर कूलरला वॉटर फिल्टर मशीन नसल्याने काही अधिकार्‍यांना डिहायड्रेशन आणि क्षारयुक्त पाण्यामुळे त्वचेचे आजार जडत आहेत. पाण्यामुळे हा त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून आलेल्या नलिनी मिश्रा यांनी अभियंत्यांना बोलावून झापले होते.

विहिरीच्या पाण्याशिवाय पर्याय नव्हता..
शासनाकडून आलेले 2.96 लाख रुपये आम्ही भरल्यानंतरही आमचे पाणी बंद केले. पर्याय म्हणून आमच्या आवारातील विहिरीतील पाणी सर्व रूममध्ये पुरवलेले आहे. पाण्याचे परीक्षण करण्याऐवजी विहिरीत ब्लीचिंग पावडर टाकून पाणी वापरलेले आहे. कृष्णा वाघ, उपअभियंता, सा. बां.

पैसे भरल्याशिवाय पाणी नाही
नियम सर्वांना सारखा असल्याने पाणीपट्टी भरल्याशिवाय आम्ही नळ जोडणी करणार नाही. विश्रामगृहात बडे मंत्री आणि अधिकारी येत असल्याने शुद्ध पाणी देणेच योग्य आहे. मात्र, पाण्याचे परीक्षण न करताच विहिरीचे पाणी दिले जात असेल तर हे गंभीर आहे. शिवाजी झनझन, मुख्य कर संकलक अधिकारी.

तीन महिन्यांच्या काळात हे बडे अधिकारी थांबले
जे. पी. डांगे : चौथ्या वित्त आयोगाचे सदस्य
एस. एस. संधू : प्रधान सचिव, ग्रामविकास
आर. जे. जाधव : माहिती आयुक्त, पुणे
उमाकांत दांगट : कृषी आयुक्त
ए. के. पटनाईक : न्यायमूर्ती, दिल्ली
शालिनी मिश्रा : निवडणूक निरीक्षक, दिल्ली
डॉ. पी. एस. चव्हाण : न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय
उज्‍जवल निकम : सरकारी वकील
अश्विनी भिडे : सचिव, शालेय शिक्षण