आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Strom's Took Away India's Share Of Monsoon

तीन वादळांनी पळवला भारताचा पाऊस, पश्चिम प्रशांत महासागरात वादळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जूनमध्ये देशभरात चांगली सलामी देणारा मान्सून जुलैमध्ये बेपत्ता झाला आहे. पश्चिम प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या उष्णकटिबंधीय वादळांमुळे नैऋत्य मान्सून क्षीण झाला आहे. त्यामुळे देशभरात १४ जुलैनंतर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. तर येत्या ७ जुलैपासून महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.

स्कायमेटच्या मते, पश्चिम प्रशांत महासागरात सध्या तीन उष्णकटिबंधीय वादळे सक्रिय आहेत. लिन्फा, चान-होम आणि नांगका अशी या वादळांची नावे आहेत. यापैकी लिन्फा हे वादळ येत्या २४ तासांत फिलिपाइन्सच्या उत्तर किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे. तर चान-होम वादळ मोठ्या चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता असून ते ५ ते ६ दिवसांत फिलिपाइन्स ते चीन ते कोरियाचा किनारा असा प्रवास करण्याची शक्यता आहे. चान-होमच्या लगतच नांगका हे तिसरे वादळ निर्माण झाले आहे. या तीन वादळांमुळे शांघाय, कोरियाचा किनारा, जपानमध्ये वादळी वारे व जोरदार पाऊस होईल, असे स्कायमेटने म्हटले आहे.

मान्सूनवर परिणाम
या तिन्ही वादळांमुळे मान्सून क्षीण होणार आहे. ही वादळे ४ जुलै ते ११ जुलै या काळात पश्चिम प्रशांत महासागरात सक्रिय राहतील. त्यामुळे भारतात १४ जुलैनंतर मान्सूनला अनुकूल वातावरण राहील, असे स्कायमेटने स्पष्ट केले आहे.
पुणे वेधशाळेचा अंदाज
५ व ६ जुलै : मराठवाडा कोरडा. विदर्भात तुरळक पाऊस
७ जुलै : मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक पाऊस
८ जुलै : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस