आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Through Tree Replantation One Thousand Forests Get New Life On Beed Road

पुनर्रोपणाद्वारे बीड रोडवरील एक हजार वृक्षांना जीवदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - धुळे-सोलापूर महामार्गावरील बीड रोडवरच्या किमान हजार वृक्षांचे पुनर्रोपण करून त्यांना जीवदान दिले जाणार आहे. या रस्त्यावरील झाडांची कत्तल थांबण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत वन विभागाने या मार्गावरील सर्व झाडांचा सर्व्हे करून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करावा, असा निर्णय झाला.

धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी किमान तीन हजार झाडांचा बळी जाणार असल्याचा अहवाल निसर्गप्रेमी संस्थांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, रस्ते दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी पाठवला होता. पर्यावरण रक्षणासाठी काम करणारे डॉ. किशोर पाठक, प्रा. मेघना बडजाते यांच्या संघटनांनी सतत पाठपुरावा केल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. गुरुवारी झालेल्या समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी, उपवनसंरक्षक अशोक गिरीपुरे, डॉ. किशोर पाठक, प्रा.मेघना बडजाते, व्ही. जे. नाईक, शैलेश राठोड आदी उपस्थित होते. या वेळी निसर्गप्रेमींनी त्यांच्या सर्वेक्षणातील नोंदी उपस्थितांसमोर मांडल्या. या रस्त्यावर वडाची जुनी झाडे असून त्यांची कत्तल थांबवावी, अशी सूचनाही केली. किमान आठशे मोठी झाडे वाचवता येतील, असे सांगितले. पुणे येथील पुनर्रोपणतज्ज्ञ शैलेश रांगडे बैठकीत उपस्थित होते. ते म्हणाले, बीड रोडवर ५० ते १०० वर्षांपूर्वीची वड, पिंपळ, औदुंबर, कडुनिंब आदी ८५० पेक्षा जास्त झाडे आहेत. असून त्यांचे पुनर्रोपण शक्य आहे. पुण्यात आम्ही असे प्रयोग यशस्वी करून दाखवले आहेत. एका झाडाच्या पुनर्रोपणासाठी किमान पाच हजार रुपये खर्च येतो. साडेतीन फुटांपर्यंत मुळे वाढलेली झाडे क्रेनने पाहिजे त्या ठिकाणी लावता येतात, असेही त्यांनी सांगितले.