आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहआयुक्तांवर शाई फेकली; दोघे अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जात प्रमाणपत्र देत नसल्याचा आरोप करत दोघांनी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सहआयुक्त एकनाथ भालेराव यांच्यावर शाई टाकण्यासाठी दऊत भिरकावली. मात्र भालेराव यांनी ती चुकवल्याने खिडकीची काच फुटून दऊत बाहेर पडली. या घटनेचे आरोपींनी मोबाइलवर चित्रीकरणही केले. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास सिडकोतील कार्यालयात हा प्रकार घडला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शाई फेकणाऱ्या दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हणमंतराव अंगदराव मामीलवाड (३५, रा. देगलूर) आणि गंगाधर सुधाकर जकुलवार (३५, रा. तरोडा) अशी हल्लेखोरांची नावे आहेत.
मामीलवाड आणि जकुलवार हे गुरुवारी दुपारी पाऊणच्या सुमारास सिडकोतील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात गेले. त्यांनी समितीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष एकनाथ भालेराव यांची भेट घेतली. सुरुवातीला दोघांनी भालेराव यांना पुष्पगुच्छ दिले. या वेळी भालेराव यांच्या दालनात उपसंचालक अनिलशेजाळे आणि शिपाई सुखदेव नव्हेरकर उपस्थित होते. भालेराव यांनी पुष्पगुच्छ स्वीकारताच मामीलवाड याने त्यांच्या अंगावर दऊत भिरकावली. मात्र, भालेराव यांनी ती चुकवल्याने ती खिडकीची काच फुटून बाहेर गेली. दोघांनी महादेव कोळी जमातीचे काम का करीत नाहीत, असे म्हणत शिवीगाळ केली. या वेळी पोलिस दक्षता पथकातील कर्मचाऱ्यांनी दोघांना पकडून ठेवले. सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक कैलास प्रजापती यांनी घटनास्थळी भेट दिली. भालेराव यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...