आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखी 'टिळा होळी' उद्या साजरी होणार, ‘दिव्य मराठी’च्या उपक्रमात पाणी बचतीची शपथ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - घोटभर पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या मराठवाड्यातील लाखो लोकांप्रति संवेदनशीलता दाखवून पाण्याच्या बचतीची शपथ घेत ‘टिळा होळी’ खेळण्याचा अनोखा उपक्रम 'दिव्य मराठी'तर्फे मंगळवारी (२२ मार्च) सकाळी दहा वाजता देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात शहरातील सर्वच स्तरांतील नागरिक, विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक सहभागी होत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून मराठवाडा दुष्काळात होरपळून निघत आहे. बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत भयंकर पाणीटंचाई आहे. घोटभर पाणी मिळवण्यासाठी लोकांना वणवण भटकावे लागत आहे. पशुपक्ष्यांची अवस्था तर आणखीच दयनीय आहे. ही बाब लक्षात घेऊन 'दिव्य मराठी'ने टिळा होळी खेळण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याचे ठरवले आहे. यामध्ये दुष्काळाचा तडाखा सहन करणाऱ्यांप्रति संवेदना व्यक्त करण्याबरोबरच पाणी बचतीची शपथही घेतली जाणार आहे. त्यात औरंगाबाद शहरातील अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. गेला आठवडाभर यासाठी शपथपत्रांद्वारे जनजागृती करण्यात आली. त्यास सर्व स्तरातील नागरिक, मान्यवरांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. दुष्काळग्रस्तांविषयी संवेदनशीलता आणि पाणी बचतीचा संदेश दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या बाबी असून त्यासाठी औरंगाबादकरांनी सकाळी दहा ते अकरा असा एक तास वेळ काढून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन 'दिव्य मराठी'तर्फे करण्यात येत आहे.

प्रत्येक व्यक्तीचा असेल सहभाग
देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर २२ मार्च रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणाऱ्या टिळा होळी उपक्रमात कोणत्याही वयोगटातील नागरिक, विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, सरकारी, निमसरकारी तसेच खासगी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, कामगार, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार महिला, शिक्षक सहभागी होऊन पाणी बचतीची शपथ घेऊ शकतील.
बातम्या आणखी आहेत...