औरंगाबाद - मराठवाडा असो वा विदर्भ, दोन्ही ठिकाणी सोन्यासारखी माणसे आहेत. मात्र तरीही मागासलेपणामुळे दोघांचे दु:ख मोठे आहे. हे दु:ख आम्ही भोगले आहे. आता ते दूर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे काळजी करू नका, पुढचा काळ मराठवाडा आणि विदर्भाचा आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विकासाची ग्वाही दिली.
प्रसिद्ध उद्योजक राम भोगले यांचा षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लाॅ स्कूलसाठी जागेची अडचण आली, असे मुख्यमंत्री भाषणात म्हणाले. तथापि, यासाठी करोडीजवळ ६० जागा घेतली होती. अर्थसंकल्पात तरतूद होती. अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती दिली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी या मुद्द्यावर दिली.
एमजीएमच्या रुक्मिणी हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
औरंगाबादला या...
विदेशात मी आधी देशात, मग राज्यात आणि औरंगाबादच्या शेंद्रा-बिडकीनमध्ये गुंतवणूक करा, असे म्हणतो.डीएमआयसीला निधी कमी पडू देणार नाही. मराठवाड्यात रेल्वेचे जाळे विणायचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
स्पाचा जीआर लवकरच
स्कूल ऑफ प्लॅंनिग अँड आर्किटेक्चर ही पुण्याला होणारी संस्था औरंगाबादेत होत आहे. लवकरच त्याचा जीआर काढू. पण या वेळी सुरू होण्याची शक्यता कमी आहे. एसपीएची सीईटी फेब्रुवारीत झाली आहे. त्यामुळे वर्षभर फायदा नाही, असे सीएमआयएचे अध्यक्ष मुनीश शर्मा म्हणाले.