आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगळे-वेगळे: शालेय विद्यार्थ्यांच्या वॉटरबॅगमधून करा पाणी बचत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शाळा आणि वॉटरबॅगचे अनोखे नाते असते. शाळेत जाणारा जवळपास प्रत्येक विद्यार्थी वॉटरबॅग घेऊन जातो. मात्र, या त्यातील 30 ते 40 टक्के पाणी बाटलीतच शिल्लक राहते. मुले हे पाणी फेकून देतात किंवा एकमेकांच्या अंगावर उडवतात. ते एका ठिकाणी साठवले तर त्याचा स्वच्छतागृहात, शाळा धुण्यासाठी किंवा झाडांना पाणी देण्यासाठी वापर होऊ शकतो. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे.

पाणीटंचाईची समस्या सर्वदूर जाणवू लागल्यामुळे त्याच्या बचतीचे नवनवीन उपाय समोर येत आहेत. जलसंवर्धन क्षेत्रात गेल्या 6 वर्षांपासून काम करणार्‍या ‘दि महाराष्ट्र सेवाभावी संस्थे’ने पाण्याच्या नासाडीचे काहीसे दुर्लक्षित क्षेत्र शोधून काढले आहे. विद्यार्थ्यांच्या वॉटरबॅगमधील पाण्याचा संस्थेने अभ्यास केला आहे. आपल्या अज्ञानतेमुळे दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे संस्थेच्या लक्षात आले.

असे केले सर्वेक्षण : संस्थेने मराठवाड्यातील 50 शाळांतील विद्यार्थ्यांच्या वॉटरबॅगची अचानक तपासणी केली. नंतर 12 शाळांतील 150 मुले आणि त्यांच्या मातांशी चर्चा केली. या चर्चेतील निष्कर्ष धक्कादायक आहेत.

असे आहेत निष्कर्ष

0 पाहणी केलेल्या 90 टक्के मुलांच्या वॉटरबॅगेत अध्र्यापेक्षा थोडे कमी पाणी शिल्लक होते.

0 150 पैकी 134 मुलांच्या वॉटरबॅगमध्ये खूप पाणी बाकी राहते.

0 110 मुले वॉटरबॅगेतील पाणी शाळेच्या मैदानावर किंवा रिक्षातून जाताना रस्त्यात फेकून देतात.

0 30-35 मुले हे पाणी मित्रांच्या अंगावर उडवतात.

0 20-25 विद्यार्थी बॉटलमधील उरलेले पाणी घरी नेतात, तर 5-7 मुले हे पाणी रस्त्यात किंवा घरी पिऊन घेतात.

0 90 पैकी 3-5 माता हे पाणी घरातील झाडांना टाकतात.

0 60 माता हे पाणी फेकून देतात. आपण पाणी वाया घालवत असल्याचे त्यांना वाटत नाही. या माता दुसर्‍या दिवशी मुलगा शाळेत जाताना तेवढय़ाच पाण्याने वॉटरबॅग धुतात.

हा आहे उपाय
वॉटरबॅगमधून वाया जाणारे पाणी शाळेत एका मोठय़ा टबमध्ये किंवा टाकीत जमा करता येऊ शकते. ते झाडांसाठी किंवा स्वच्छतागृहात वापरता येऊ शकते. तसेच शाळेच्या स्वच्छतेसाठीही हे पाणी वापरणे शक्य आहे. या कामासाठी शाळांनी जलमित्र ही संकल्पना राबवावी. प्रत्येक वर्गातून एका जलमित्राची निवड करावी. त्याने स्वत: पाण्याची बचत करताना इतर विद्यार्थ्यांनाही याची सवय लावावी. यातून पाण्याची मोठी बचत शक्य असल्याचे संस्थेचे मत आहे.

छोट्या उपायातून मोठी बचत
छोट्यांच्या वॉटरबॅगमधून होणारी पाण्याची मोठी नासाडी ही दुर्लक्षित बाब आहे. हे पाणी वाचवणे आपल्या हातात आहे. शाळांनी ठरवले तर हे पाणी वाचवणे शक्य आहे. लहान वयात पाणी बचतीचे संस्कार झाले तर मुलांना मोठे झाल्यावरही ही सवय कायम राहील. हळूहळू संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबवायचा आहे. यासाठी अधिकाधिक लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे.
व्ही. एल. पाटील, अध्यक्ष, दि महाराष्ट्र सेवाभावी संस्था

अशी होते पाण्याची नासाडी
> शाळेतील 100 टक्के विद्यार्थी 1 लिटर क्षमतेच्या वॉटरबॅग आणतात. यापैकी 90 टक्के विद्यार्थ्यांच्या वॉटरबॅगमध्ये 25 ते 40 टक्के पाणी शिल्लक राहते. सरासरी एका वॉटरबॅगेत 30 टक्के पाणी उरते. म्हणजेच एका बाटलीत 30 मिलि पाणी राहते.

> एक हजार विद्यार्थ्यांपैकी 900 विद्यार्थ्यांच्या वॉटरबॅगमध्ये 30 मिलि या हिशेबाने दररोज 270 लिटर पाणी शिल्लक राहते.

> एका वर्षात सुट्या सोडून 215 दिवस शाळा चालते. दररोज 270 लिटर पाणी या हिशेबाने वर्षाला 58 हजार 50 लिटर पाण्याची नासाडी होते. ही एका शाळेतील आकडेवारी आहे. शहरातील सर्व शाळांचा विचार केला तर किती पाणी वाया जाते, याचा अंदाज येतो.