आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसगावकरांच्या नशिबी नको नारेगाववासीयांच्या नरकयातना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- कचराडेपोमुळे नारेगावातील रहिवासी सध्याच अनेक अडचणींचा सामना करत आहेत. तिसगाव परिसरात कचरा प्रकल्प उभारण्याची तयारी मनपाने केली आहे. मात्र, नारेगाववासीयांच्या नरकयातना तिसगावाकरांच्या नशिबी नकोत अशी भावना शुक्रवारी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. तसेच शहरातील घाण तिसगावात आणण्याचा आटापिटा खासदार चंद्रकांत खैरे करीत आहेत.
कचरा डेपोच्या सर्वेक्षणासाठी अधिकारी आलेच तर हाती रुमणे विळे घेऊन त्यांना प्रखर विरोध करा, मी स्वत: सर्वात पुढे राहीन, अशी ग्वाही आमदार सुभाष झांबड यांनी दिली. प्रस्तावित कचरा डेपोला विरोध करण्यासाठी सकाळी ११ वाजता झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
तिसगाव येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी गायरान जमीन गट क्र.२२७/१ देण्यात यावी, यासाठी औरंगाबाद मनपाने विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला आहे. मनपा आयुक्त प्रकाश महाजन खासदार चंद्रकांत खैरे यांनी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांची भेट घेऊन तिसगावच्या खवड्या डोंगराजवळील शासकीय जमीन देण्याची मागणी केली आहे. ही जमीन देण्यास प्रस्तावित कचरा प्रकल्प उभारण्यास परिसरातील बजाजनगर, करोडी, वाळूज महानगर, भांगसीमाता गड भागातून विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर तिसगाव परिसरात बैठक घेण्यात आली. आमदार झांबड यांच्यासह माजी मंत्री गंगाधर गाडे, जितेंद्र देहाडे, सरपंच अंजन साळवे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामचंद्र कसुरे, राजू गोल्हार, माजी सरपंच संजय जाधव, मिठुलाल पहिलवान यांनीही बैठकीत मत व्यक्त करून प्रस्तावित कचरा डेपोला जोरदार विरोध दर्शवला. प्रस्तावित कचरा प्रकल्पात विविध प्रयोग करून तो उभारण्याचे सांगितले जात आहे. मग सुधारित कचरा प्रकल्प नारेगावातच का केला जात नाही, असा प्रश्न उपस्थितांनी केला. कोणताही विकास साधताना त्याला पाठिंबा राहीलच, मात्र तो जनतेला समोर ठेवून त्यांच्या हिताचा विचार करून व्हायला हवा. तो घाणेरड्या राजकारणाचा भाग ठरू नये, अशा प्रखर भावना या वेळी व्यक्त करण्यात आल्या.

ग्रामपंचायत सदस्या मंदा गाडेकर, कविता काळे, सारिका जाधव, गीताबाई शांतवणे, संगीता भोसले, ताराबाई वाघ, कलाबाई खरात, नंदा लोखंडे, सोनाली बनकर, अर्चना वाडेकर, अनिता हिवाळे, रंजना नाडे, नंदाबाई गायकवाड, अरुणा लोखंडे उपस्थित होत्या. राणोजी जाधव यांनी सूत्रसंचालन, तर सरपंच अंजन साळवे यांनी आभार मानले.

प्रस्तावित कचरा डेपोला विरोध करण्यासाठी तिसगाव चौफुलीवर ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीत आमदार सुभाष झांबड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. छाया : धनंजय दारुंटे

विरोधाचा ठराव घेणार
तिसगाव,वाळूज, पंढरपूर, वडगाव कोल्हाटी, साजापूर, करोडी, गोलवाडी यालगतच्या सर्व ग्रामपंचायती ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये कचरा डेपोच्या विरोधात ठराव घेणार आहेत. हे सर्व ठराव विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर केले जाणार आहेत. परिसरातील वळदगाव, साजापूर, गंगापूर नेहरी, धरमपूर, शरणापूर, वंजरवाडी ग्रामस्थांनी या वेळी तिसगावकरांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

ऑक्टोबरला आंदोलन
मनपानेजनतेचा रोष पत्करून कचरा डेपो उभारू नये. तो प्रयत्न परिसरातील कष्टकरी, कामगार, ग्रामपंचायत प्रशासन सर्वपक्षीय पुढारी हाणून पाडतील. नारेगाववासी सध्या नरकयातना भोगत आहेत. हाच प्रकार तिसगावात होऊ द्यायचा का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. ऑक्टोबर रोजी लिंकरोड चौकात आंदोलन केले जाणार असल्याचे सरपंच साळवे यांनी जाहीर केले. या आंदोलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.