आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिसगावकरांनी उपसा योजनेला ठोकले टाळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - तिसगावच्या तलावातून भारत निर्माण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वडगाव कोल्हाटी गावाला सुरू असलेला पाणीपुरवठा तिसगाव ग्रामस्थांनी उपसा योजना रूमला ताळे ठोकून मंगळवारी पाणीपुरवठा बंद पाडला. तलावातून होणार्‍या पाणी उपशामुळे हातपंप व इतर जलसाठे कोरडे पडत असल्यामुळे पाणी उपसा बंद करण्याची मागणी तिसगाव ग्रामस्थांनी केली आहे.

तिसगावच्या खवड्या डोंगरालगत लघु तलाव आहे. या तलावाशेजारी तिसगावाला पाणीपुरवठा करणारी एक व दुसरी गावाच्या मध्य भागात विहीर आहे, तर 18 हातपंप आहेत. त्याद्वारे गावाला पाणीपुरवठा केला जातो. गावालगत उत्तरेस लघु तलाव असल्याने गावातील हातपंप व विहिरींना सध्या बर्‍यापैकी पाणी आहे. मात्र, आता उन्हाळा तोंडावर आलेला आहे. या तलावातूनच वडगाव कोल्हाटीसाठी पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे तलावातील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे तिसगावातील हातपंप व विहिरींचे पाणीही आटण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळेच ग्रामपंचायत सदस्य तारासिंग तरैयावाले, बबिता होर्शिळ यांच्यासह ग्रामस्थांनी उपसा रूमला टाळे ठोकले.

या वेळी आदेशकुमार वाकोडे, विमल गायकवाड, लताबाई फासगे, मंगल घरळे, बाबूराव मगरे, रंजना अडसुळे, रेखा ठोंबरे, सिंधूबाई मंजुळे, छाया जोगदंड, तुळसाबाई शेजूळ, कासाबाई पवार, सीताबाई खुळे, सुंदरबाई शेजवळ, मीनाबाई नितनवरे, छाया दाभाडे, संगीता जाधव, तुळसाबाई पवार, अनुसया सुरे, सीताबाई खुळे, संगीता जाधव यांचा आंदोलनात सहभाग होता.

मागील तीन वर्षांपासून परिसरात अत्यल्प पर्जन्यमान आहे. त्यामुळे तलावात जेमतेम पाणी आहे. भविष्यात गावासमोर भीषण पाणी संकट उभे ठाकणार आहे. त्यामुळेच वडगाव कोल्हाटीचा पाणीपुरवठा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. तारासिंग तरैयावाले, ग्रामपंचायत सदस्य, तिसगाव

अद्याप योजना अपुरी
वडगाव ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अद्याप अपुरे असल्याने ती ग्रामपंचायतीकडे वर्ग झालेली नाही. तिची किरकोळ कामे राहिल्याने त्यावरील पाणीपुरवठय़ाबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल, तो आम्हाला मान्य असेल. छाया कार्ले, सरपंच, वडगाव कोल्हाटी

पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे तलावातील उपसा बंद करावा, या आशयाचे पत्र वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीला दिले होते. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. - मिठ्ठलाल तरैयावाले, सरपंच, तिसगाव

तलावातील पाणी कमी होत असल्याने हातपंप, विहिरींचेही पाणी कमी होत आहे. मग पिण्याच्या पाण्यासाठी कोठे जाणार? त्यासाठी पाणीपुरवठा बंद पाडला. बबिता होर्शिळ, ग्रामपंचायत सदस्या, तिसगाव