आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकांना आनंद देण्यातच खरे समाधान : बांदेकर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मी राजकारण आणि व्यवसाय याची कधीच सरमिसळ करत नाही. दोन्ही क्षेत्रे भिन्न आहेत. हे वेगळेपण जपल्यामुळेच ‘होम मिनिस्टर’च्या चित्रीकरणाच्या ठिकाणी शिवसैनिक कधीच गर्दी करत नाहीत. लोकांना आनंद देण्यासाठीच मी आलो आहे. यातच खरा आनंद आहे, असे प्रतिपादन शिवसेना सचिव आणि कलावंत आदेश बांदेकर यांनी केले.

झी मराठीवरील ‘होम मिनिस्टर’च्या सहा भागांच्या चित्रीकरणासाठी आदेश बांदेकर शहरात आले आहेत. ज्योतीनगरात ‘दिव्य मराठी’ने त्यांच्याशी संवाद साधला. आदेश म्हणाले, माझे कामावर खूप प्रेम आहे. तीन दिवसांपूर्वी मी केसरी टूर्ससोबत दुबईत होतो. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या कार्यक्रमात सहभागी झालो. रामकथेतही जाऊन आलो. 27 ला मुंबईत, तर 28 ला सकाळपासून नाशकात आहे. स्टार प्रवाहवरील ‘लक्ष्य’ मालिकेचे शूटिंगही असतेच. दिवसा शूटिंग आणि रात्री मीटिंग असा दिनक्रम सुरू आहे, पण कामामुळेच मला लोक ओळखतात याची जाण आहे. मी व्यवसायात राजकारण आणि राजकरणात व्यवसाय आणत नाही. हेच माझ्या यशाचे रहस्य आहे, असे त्यांनी सांगितले.

होम मिनिस्टरचे यश
नऊ वर्षात होम मिनिस्टरच्या शूटिंगसाठी आदेश आणि झी मराठीच्या चमूने साडेनऊ लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे. आदेश म्हणतात, या प्रवासात मला अनेक लोकांना भेटता आले. त्यांचे दु:ख समजून घेता आले. या लोकांशी भावनिक नाते निर्माण झाले. माझ्यावर विश्वास बसल्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकही घरातील गोष्टी सांगतात. मी माझ्या परीने त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो.

कवितेची बाग प्रत्येक शहरात व्हावी
ज्योतीनगरातील क वितेची बाग पाहून आदेश भारावून गेले. विस्मृतीत गेलेल्या कवींच्या कवितांना या बागेत आल्यामुळे उजाळा मिळतो. असे उपक्रम प्रत्येक शहरात होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली, असे झाले तर मराठीला मरण नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.