आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - शहरांतील नव्या कॉलनी व गुंठेवारी वसाहतींमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्या भागातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची भटकंती थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी सूचना शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केली आहे. मुख्य जलवाहिनीतून देण्यात आलेले उपजोड (बायपास) त्वरित बंद करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी आयोजित पाणीटंचाईच्या आढावा बैठकीत दर्डा यांनी ही सूचना केली. आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्यासह इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते. शहरात अनेक ठिकाणी मुख्य जलवाहिनीला अनधिकृत जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही मोजक्या भागांत जास्त पाणी तर इतर ठिकाणी तीव्र टंचाई भेडसावते. हे टाळण्यासाठी उपाय योजावेत, नव्या नागरी वस्त्यांत जास्त टँकर सुरू करावेत, अशी मागणी दर्डा यांनी केली.
आयुक्त जयस्वाल यांनी सांगितले की, नांदेड जिल्ह्याचा पाणीसाठा वगळता मराठवाड्यात आजघडीला केवळ 1 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. विविध धरणांतील मृतसाठ्यांतून अनेक गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी यंदा प्रथमच शहरी भागाचाही टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सांगितले, जायकवाडी धरणात 4 एप्रिलपर्यंतचाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यानंतर मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा करावा लागणार आहे. एप्रिलमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील टँकरची संख्या साडेपाचशेच्या वर जाऊ शकते, असे ते म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.