आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • To Release Water In Jayakwadi, For That Demand To Chief Minister Ashok Chavan

जायकवाडीत पाणी सोडले जावे, त्यासाठी मुख्‍यमंत्र्यांकडे मागणी करावी - अशोक चव्हाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - यंदा चांगल्या पावसामुळे जायकवाडीत 27 टक्के पाणी आहे. मात्र, आणखी 30 टक्के पाणी वरच्या धरणांतून सोडले जावे, त्यासाठी सर्वांनीच मुख्यमंत्र्यांकडे मागणी लावून धरावी, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.


जायकवाडीच्या पाण्यासंदर्भात चव्हाण म्हणाले, आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी या धरणात किमान 50 टक्के पाणी असायलाच हवे. गतवर्षी जालन्यात भयानक परिस्थिती होती. याही वर्षी वरच्या धरणांतून पाणी सोडले नाही तर मराठवाड्याला अन् जालन्याला तीव्र पाणीप्रश्न भेडसावेल. त्यामुळे उद्या (शनिवारी) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जिल्ह्यात येत असताना त्यांच्याकडे यासंदर्भातील मागणी लावून धरावी, असे ते म्हणाले.
या वेळी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, अ‍ॅड. राहुल चव्हाण आदींची उपस्थिती होती.
असं मीही ऐकलंय : आता अशोक चव्हाण हेच नेते हवेत, अशी मागणी मराठवाड्यात काँग्रेसमधून जोर धरू लागली आहे. याबाबत काय सांगाल, या प्रश्नावर त्यांनी ‘होय, मीही ऐकलंय’, असे म्हणत स्मितहास्य करून याविषयी अधिक बोलणे टाळले.


पाणीप्रश्न शरद पवारांच्या कोर्टात
जायकवाडीच्या वरील भागांत असलेल्या धरणांतील पाणी मराठवाड्याला देण्यासंबंधीच्या निर्णयाचा चेंडू राष्‍ट्रवादी काँग्रेसने आता शरद पवार यांच्या कोर्टात टाकला आहे. पवार पुढील आठवड्यात यासाठी बैठक घेणार असल्याचे सांगून मराठवाड्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यामुळे तेच निर्णय घेतील, असे पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मराठवाड्याचा पाणीप्रश्न भीषण आहे. येथील आमदारांशी चर्चा केली तेव्हा सर्वांच्याच भावना तीव्र असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पवारांशी चर्चा करून या भागातील पक्षाचे चार मंत्री, खासदार, आमदार आणि जिल्हा अध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल. त्यात नक्कीच ठोस निर्णय होईल, अशी अपेक्षा आव्हाड यांनी व्यक्त केली. ‘राइट टू रिजेक्ट’ अनिवार्य करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने पक्षाच्या उमेदवारांवर काहीही फरक पडणार नाही, असे सांगून यापूर्वीही मतदारांना हा अधिकार होता, असे ते म्हणाले.