आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचा आज 35 वा वर्धापन दिन: रस्त्यांची यादी अन् निविदेत संपले वर्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शुक्रवारी महानगरपालिकेचा ३५ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. मावळत्या वर्षात शहरात वर्षभर दीडशे कोटींच्या रस्त्याची यादी त्यानंतर त्यांच्या निविदा प्रक्रिया याचीच चर्चा होती. अखेर निविदा उघडण्यात येत आहे. त्यामुळे आगामी वर्षभर दीडशे कोटींच्या कामांचीच चर्चा राहील. या वर्षात काही रस्ते पूर्ण होऊ शकतात. दुसरीकडे समांतर जलवाहिनीचा प्रकल्प ठेकेदारामार्फत होणार की महानगरपालिका करणार याचा फैसलाही या वर्षाच्या प्रारंभीच अपेक्षित आहे. त्यानंतर समांतरच्या कामावरही या वर्षभरात प्रसिद्धीचा झोत असेल.

 

परिस्थिती प्रतिकूल असली तरी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या पुढाकाराने या संस्थेचा वर्धापन दिन मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातोय. मुख्यालयातही काहीसे उत्साहाचे वातावरण आहे. हाच उत्साह वर्षभर राहिला तर नागरिकांच्या हिताचे काय होऊ शकते याचा कानोसा घेतला असता सर्वप्रथम रस्त्यांची कामे समोर येतात. या महिन्यात निविदा उघडून ठेकेदारांना काम दिले जाऊ शकेल. म्हणजेच पुढील महिन्यात प्रत्यक्षात रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ होईल. काही रस्ते वर्षभरात पूर्ण होतील, तर वर्षाच्या शेवटी शहर बऱ्यापैकी खड्डेमुक्त झालेले दिसेल. ५२ रस्त्यांची कामे शहरात होणार आहेत. त्यामुळे तुम्ही शहराच्या कोणत्याही भागात जाल तेथे तुम्हाला रस्त्याचे काम सुरू झालेले दिसेल. त्यामुळे रस्त्याच्या कामाची चर्चा हा औरंगाबादकरांच्या चर्चेचा अविभाज्य घटक असेल.

 

दुसरीकडे न्यायालयाचा निकाल किंवा न्यायालयबाह्य वाटाघाटी होऊन समांतर जलवाहिनीचे काम सुरू होईल. अर्थात, हे काम महापालिका करणार की ठेकेदार हेही या वर्षाच्या प्रारंभी स्पष्ट होऊ शकते. काहीही असो, या प्रकल्पाचे काम सुरू होणार हे नक्की. या वेळी काम सुरू होईल तेव्हा आधी जायकवाडीपासून ते फारोळ्यापर्यंतची मोठी वाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. नंतर जलवाहिन्या टाकल्या जातील. त्यामुळे मुख्य वाहिनीचे काम किती पूर्ण होते याकडे औरंगाबादकरांचे लक्ष लागलेले असेल.

 

वायफाय, शहर बस
स्मार्टसिटीची मावळत्या वर्षात फक्त चर्चाच होती. प्रत्यक्षात एकही काम सुरू झालेले नाही. परंतु या वर्षभरात सिटी बस, वायफाय, घनकचरा प्रकल्प, सोलर प्रोजेक्ट असे काही प्रकल्प सुरू होऊ शकतील. वायफाय आणि शहर बस याचा थेट फायदा नागरिकांना होणार आहे. त्यामुळे नागरिकांचे याकडेही लक्ष असेल. या चार गोष्टी महापालिकेच्या ३६ व्या वर्षात होऊ शकतात, असा अंदाज आता तरी आहे.

बातम्या आणखी आहेत...