आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज विद्यापीठाचा 57 वा दीक्षांत समारंभ, दिमाखदार व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी हेल्पडेस्कची सुविधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ मंगळवारी (३० मे) सायंकाळी चार वाजता विद्यापीठ नाट्यगृहात होणार असून भारताच्या माजी राजदूत तथा माजी परराष्ट्रीय सचिव निरुपमा राव यांची प्रमुख उपस्थिती राहील. या समारंभात १६ हजार पदवीधर आणि ४५० पीएचडीधारकांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने हेल्प डेस्क, पदवी प्रमाणपत्र वितरणासाठी ४४ आणि गाऊनसाठी स्टॉल्स उभारले आहेत. पीएचडीच्या विद्यार्थ्यांना मात्र थेट नाट्यगृहात नोंदणी करता येईल. 

समारंभाच्या यशस्वितेसाठी २० समित्या स्थापन करून १३३ जणांना कामांची जबाबदारी दिली आहे. सर्व सदस्य प्रमुखांची आढावा बैठक सोमवारी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेत पार पडली. दीक्षांत समारंभात जवळपास १६ हजार जणांना पदवी प्रदान करण्यात येईल. शिवाय ४५० पीएच.डी. धारकांनी समारंभात पदवी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नोंदणी केली आहे. यात कला, सामाजिक शास्त्रे, ललित कला यांच्यासाठी निळा गाऊन राहील. वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्रासाठी चॉकलेटी, विज्ञान-केसरी, विधी-हिरवा, अभियांत्रिकी तंत्रज्ञान-जांभळा, शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षण-पिवळ्या रंगांचे गाऊन उपलब्ध करून दिले आहेत. पदवी प्रमाणपत्र वितरणासाठी ४४ डेस्क असतील. सर्वाधिक १५ अभियांत्रिकीसाठी असतील. एम.ए.- ५, बीएस्सी- ७, बीकॉम-४, एमकॉम-२, एमएस्सी-२, बीकॉम (ओल्ड)-१ डेस्क उभारले आहेत. त्याशिवाय फार्मसी, विधी, व्यावसायिक अभ्यासक्रम, बीबीए, एमसीए, बीसीएसाठी प्रत्येकी एक डेस्क असेल. 

४४ डेस्कवर प्रत्येकी तीनशे पदवी प्रमाणपत्रे 
राजर्षी शाहू महाराज परीक्षा केंद्राच्या परिसरात ४४ स्वतंत्र डेस्क उभारण्यात आले आहेत. यापूर्वीच्या दीक्षांत समारंभाच्या वेळी फक्त २७ डेस्क उभारण्यात आले होते. यंदा वाढवून डॉ. राजेश रगडे यांनी ४४ केले आहेत. मंगळवारी सकाळी आठपासूनच पदवी प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहे. प्रत्येक डेस्कवर तीनशे पदवी प्रमाणपत्रे वितरणासाठी ठेवण्यात आली आहे. यामुळे गर्दी आटोक्यात येण्याची शक्यता कुलगुरूंनी वर्तवली आहे. 

जालना, उस्मानाबाद, बीड आणि औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी आठ माहिती सुविधा केंद्रे (हेल्प डेस्क) उभारण्यात आले आहेत. या केंद्रांवर माहिती देण्यासाठी प्रत्येक हेल्प डेस्कला दोन कर्मचारी आणि तीन विद्यार्थी असतील. विद्यापीठ गेट, कुलगुरू निवासस्थान, नाट्यगृह, वाय पॉइंट, इतिहास वस्तुसंग्रहालय, परीक्षा भवन, प्रशासकीय इमारतीसमोरील झेरॉक्स सेंटर येथे ही केंद्रे उभारण्यात आली आहेत. केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊन त्यांचे समाधान करण्यात येईल, असे डॉ. सुहास मोराळे यांनी सांगितले. 

विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी 8 हेल्पडेस्कची सुविधा 
४४ काउंटर
२३ समित्यांचे नियोजन 
४५० जणांना पीएचडी 
०८ हेल्पडेस्क 
४५० दीक्षांतसाठी मनुष्यबळ 
१६,४२५ जणांना पदवी 
 
दीक्षांत’नंतर विद्यापीठात बदल्यांचे सत्र 
चौका येथील श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीतील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर परीक्षा मूल्यमापन मंडळातील सात कर्मचाऱ्यांच्या बदल्यानंतर पूर्ण प्रशासनात फेरबदलाचे संकेत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिले आहेत. दीक्षांत समारंभानंतर अनेक कर्मचाऱ्यांच्या विभागांतर्गत बदल्या करणार आहोत, त्यासाठी माहिती घेण्याचे काम अधिकाऱ्यांवर सोपवले असल्याचे त्यांनी सांगितले.
 
दीक्षांत समारंभाच्या तयारीनिमित्त पत्रकारांनी सोमवारी (२९ मे) कुलगुरूंशी संवाद साधला. परीक्षा विभागातील सात कर्मचाऱ्यांच्या बदल्यांव्यतिरिक्त आणखी काही जणांच्या बदल्यांचे नियोजन आहे का?, या प्रश्नावर त्यांनी होकार्थी उत्तर दिले. 

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अक्षय पाटील यांनी परीक्षा विभागातील कर्मचारी-अधिकाऱ्यांचे पाल्य विविध अभ्यासक्रमांची परीक्षा देत असल्याचे कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिले होते. कुलगुरूंनी प्रभारी परीक्षा संचालक डॉ. राजेश रगडे यांना पाटील यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने माहिती घेण्यास सांगितले होते. डॉ. रगडे यांनी तीन दिवसांत माहिती संकलित करून कुलगुरूंना सादर केली. त्यांच्या विभागात १६ ते १७ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पाल्य परीक्षार्थी असल्याचे डॉ. चोपडे यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. 

मंगळवारी होणारा दीक्षांत समारंभानंतर या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. मात्र त्यांच्या जागी प्रशासकीय इमारतीत काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना नेमण्यापूर्वी त्यांचे पाल्यही परीक्षार्थी असण्याची शक्यता कुलगुरूंना वाटते. त्यामुळे सर्वांचीच माहिती काढून प्रशासकीय इमारत आणि परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे सत्र जूनच्या पहिल्या आठवड्यात राबवले जाणार आहे. अास्थापना विभागाने त्यासाठी तयारी केली आहे. फक्त दीक्षांत समारंभ आटोपण्याची प्रतीक्षा केली जात आहे. 
बातम्या आणखी आहेत...