आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Aurangabad Jilha Parishad Present It's Budget

आज सादर होणार औरंगाबाद जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प (बजेट) अर्थ समिती सभापती डॉ. सुनील शिंदे मंगळवारी मांडणार आहेत. जिल्हा दुष्काळाने होरपळत असला तरी पाणीपुरवठय़ावर गतवर्षीच्या तुलनेत केवळ 4 ते 5 लाख रुपयांची जादा तरतूद होऊ शकेल, अशी माहिती सोमवारी खात्रीलायक सूत्रांनी दिली. या अर्थसंकल्पात पदाधिकार्‍यांच्या मानधनातही घसघशीत वाढ अपेक्षित आहे.

यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी 1 वाजता जि.प.ची सर्वसाधारण सभा होणार असून त्यात हा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. डॉ. शिंदे पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडणार आहेत. सध्याची पाणीटंचाई पाहता विशेष उपाययोजनांचा समावेश असलेला अर्थसंकल्प लोकांना अपेक्षित आहे.

काही जि.प. सदस्य, पदाधिकार्‍यांनी दै. ‘दिव्य मराठी’शी केलेल्या चर्चेतून काही अंदाज वर्तवले. अर्थसंकल्पात पाणीपुरवठय़ासाठी निधी अथवा विशेष योजना नसेल. मात्र, सर्वांना प्रिय असणार्‍या सिंचनासाठी जवळपास तीन कोटी रुपयांची वाढीव तरतूद असू शकते. पशुसंवर्धन, कृषी, समाजकल्याण आणि आरोग्य विभागाला गतवर्षीच्या तुलनेत केवळ तीन-चार लाखांची वाढ मिळू शकेल. मोजक्या नवीन योजना आणि काही योजनांतील आकडे कमी-जास्त करून बाकी सर्व योजना जशाच्या तशाच मांडल्या जाऊ शकतात. पदाधिकार्‍यांच्या वाहनांच्या इंधनासाठी दुप्पट म्हणजे 40 लाखांची तरतूद होऊ शकते.

पदाधिकार्‍यांचे मानधन लाखांवरून कोटीच्या घरात
अध्यक्ष, सभापती व उपसभापतींचे मानधन सात लाख 86 हजारांवरून एक कोटीपर्यंत वाढू शकते. भत्ते पूर्वीइतकेच राहू शकतात. घसारा निधीतही फारसा बदल होण्याची शक्यता नाही.
सिंचनावर मेहेरबानी?
दरवर्षी सिंचनावर कोट्यवधींची कामे करूनही सिंचन होत नसले तरी सदस्यांच्या आग्रहाखातर या वर्षात सिंचनावर दोन कोटी रुपयांची जास्तीची तरतूद केली जाऊ शकते. गतवर्षी 94 लाखांची तरतूद होती.
कृषीचे कोटकल्याण
या विभागासाठी किमान एक कोटीच्या जवळपास तरतूद असू शकते. त्यात खत, पेरणी, पाइप पुरवठा, डिझेल संच, ताडपत्री, संगणक दुरुस्ती, विमा आणि इंधनासाठी वेगळी 22-25 लाखांची तरतूद होण्याची शक्यता आहे.
पाणीप्रश्नी तोडगा
ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी एक कोटीऐवजी एक कोटी पाच ते सहा लाखांचा निधी मिळू शकतो. पैठण नाथषष्ठी यात्रेच्या टँकरसाठी चार लाखांऐवजी पाच लाखांची तरतूद केली जाऊ शकते.
बांधकामासाठी भरघोस निधी?
फुलंब्री विर्शामगृहासाठी गतवर्षी तरतूद नव्हती, पण यंदा पाच ते दहा लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. रस्त्यांची दुरुस्ती व जि .प. विर्शामगृहाकडे सदस्यांचा कल पाहून याकामी 30 ते 40 लाखांची वाढ होऊ शकेल. पदाधिकार्‍यांच्या दालन दुरुस्तीला 30 लाख मिळू शकतील. तीन वर्षांपासून मुख्यालयासमोरची बाग ओस पडली तरी त्यावरील खर्च थांबला नसल्याने एक लाखाचा खर्च पाच ते सहा लाखांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.
आरोग्य, महिलांसाठी काय?
आरोग्य विभागाचा औषध पुरवठा करण्यावर भर असून समाजकल्याण विभागाकडून कडबा कटर योजनेचा समावेश होऊ शकतो. महिला बालकल्याण विभागाकडून या वेळी गरीब महिलांना शेवया तयार करण्याचे मशीन दिले जाणार की नाही, यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. तथापि, अपंग महिला व मुलींना स्वयंरोजगाराचे साहित्य पुरवले जाऊ शकते. खात्रीलायक सूत्रांनी हा अंदाज वर्तवला आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी खालील काही पर्याय सुचवले आहेत.
*तीव्र पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये जनावरांसाठी पाण्याचा हौद.
*चारा छावण्या, पाणी साठवण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा प्लास्टिकच्या टाक्या देणे.
*विहीर पुर्नभरण, जुने बोअर दुरुस्ती, कोल्हापुरी बंधारे आणि पाझर तलावाचा गाळ काढून शेतकर्‍यांच्या शेतात टाकणे.
*जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतींवर वॉटर हॉर्वेस्टिंग करणे.