आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today CET For Aspirants Of Municipal Corporation Elections

महापालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांसाठीची आज पात्रता चाचणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - 'दिव्य मराठी'तर्फे औरंगाबाद महापालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांसाठीची पात्रता चाचणी चार एप्रिल रोजी होणार आहे. सिडको एन-४, उच्च न्यायालयाजवळ येथील शिवछत्रपती महाविद्यालयात सकाळी १०.४५ वाजता परीक्षेला सुरुवात होणार आहे. त्यात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या इच्छुकांसह अपक्षांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे. ५० गुणांची ही लेखी परीक्षा दीड तास म्हणजे साडेबारा वाजेपर्यंत चालेल.

यात सर्वोत्तम गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत. मात्र, कमीत कमी गुण मिळवणाऱ्या किंवा अनुत्तीर्ण होणाऱ्यांची नावे जाहीर केली जाणार नाहीत.
बहुतांश निवडणुकांत कोणत्या उमेदवाराला मतदान करायचे, याबाबत मतदारांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येते. विशेषत: महापालिका निवडणूक विकास कामांऐवजी जात, धर्म, नातीगोती अशा निकषांवर लढवली जाते. अशा वेळी दगडापेक्षा वीट मऊ पाहून मतदान केले, असे अनेक मतदारांचे म्हणणे असते. वस्तुत: महापालिका म्हणजे स्थानिक सरकार असते. रस्ते, पाणी, वीज, सफाईची कामे महापालिकेतर्फेच होतात. त्यामुळे नगरसेवकाची निवड करताना जनसंपर्क आणि कामांची जाण, प्रशासन व महापालिका कायद्यांची माहिती या बाबी महत्त्वाच्या असतात. प्रत्यक्षात नगरसेवक म्हणून काय आणि कसे काम करायचे असते, याची जाण उमेदवाराला आहे की नाही, हेही मतदारांना माहिती नसते. अनेक उमेदवारही कामाचे स्वरूप आणि पद्धती समजून न घेताच मतदारांना आश्वासने देतात आणि महापालिकेत गेल्यावर मात्र त्यांचा प्रभाव पडत नाही, असेही प्रकार घडले आहेत. हे औरंगाबादेत यापुढे होऊ नये म्हणून नगरसेवकपदासाठी उमेदवारी करण्याआधीच नगरसेवकाला आवश्यक असलेले िकमान ज्ञान आपल्याकडे आहे, हे मतदारांना सांगता यावे आणि मतदारांनाही योग्य उमेदवार निवडण्यासाठी मदत व्हावी, यासाठीच या चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
राजकीय पक्षांनाही होईल मदत : नवख्या उमेदवारांना तिकीट देताना त्या उमेदवाराला महापालिकेच्या कारभाराविषयी िकमान माहिती आहे की नाही, हे राजकीय पक्षांकडून फारसे तपासले जात नाही. तशी व्यवस्थाच उपलब्ध नसल्याने अनेकदा राजकीय पक्षांकडून केवळ निवडून येण्याची क्षमता हाच निकष लावून उमेदवार िदले जातात. ते निवडून आले तरी त्या पक्षाचा प्रभाव महापालिकेत पाडू शकत नाही, असाही अनुभव आहे. निवडून येण्याच्या क्षमतेबरोबरच किमान आवश्यक पात्रता सिद्ध केलेले उमेदवार निवडणे या चाचणीमुळे राजकीय पक्षांनाही शक्य हाेईल. केवळ मनपाच्या कारभारातच नव्हे तर निवडणुकीच्या प्रचारातदेखील िकती पात्र उमेदवार िदले, हे राजकीय पक्ष मतदारांसमोर मांडू शकतील. असाही दृष्टिकोन या परीक्षेच्या आयोजनामागे आहे.

किमान २५ गुण मिळवणारे उत्तीर्ण; प्रमाणपत्रही मिळणार, विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्यांची यादी देणार

नोंदणी झाली नसली तरी होऊ शकाल सहभागी
परीक्षेला इच्छुक उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. नोंदणीची मुदत संपल्यावरही अनेकांनी आम्हाला परीक्षा देण्याची इच्छा असल्याचे सांगितले. ही बाब लक्षात घेऊन नोंदणी झाली नसली तरी ऐनवेळी शिवछत्रपती महाविद्यालयात सकाळी साडेदहा वाजता येणाऱ्यांना परीक्षा देता येणार आहे.

५० गुणांचा पेपर
ही परीक्षा ५० गुणांची आहे. त्यात २५ आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्यांना उत्तीर्ण समजले जाईल. त्यांना प्रमाणपत्रही िमळेल. विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होणाऱ्यांची यादी सोमवारी जाहीर केली जाईल.

नोंदणीला प्रचंड प्रतिसाद
चाचणी परीक्षेसाठी मंगळवारी सकाळपासून नोंदणी सुरू झाली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. व्हॉट्सअॅप, एसएमएसद्वारे तसेच "दिव्य मराठी' कार्यालयात येऊन अनेकांनी नावे नोंदवली. तीन एप्रिल रोजी दुपारी चार वाजता मुदत संपल्यानंतरही नोंदणीचा ओघ सुरू होता. परीक्षेचे स्वरूप, गुण, प्रश्नांचे विषय अाणि वेळ व ठिकाण याविषयीही इच्छुकांनी चौकशी केली. या चाचणीचे औरंगाबादकरांकडून उत्तम स्वागत झाले. अनेक उद्योजक, वकील, डाॅक्टर्स, व्यापारी आणि काही निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे स्वागत करणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी परीक्षेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

बहुपर्यायी आणि लघुत्तरी प्रश्न
या चाचणीचा उद्देश महापालिकेत मतदारांचे प्रभावीपणे प्रतिनिधित्व करण्यासाठी आवश्यक असलेली िकमान माहिती उमेदवाराला आहे की नाही, हे तपासणे हाच अाहे. म्हणून त्याच पद्धतीचे बहुपर्यायी आणि लघुत्तरी प्रश्न यासाठी विचारले जाणार आहेत. त्यांचे स्वरूप आणि व्यापकता स्पष्ट करणारा तपशीलही "दिव्य मराठी'ने यापूर्वी जाहीर केला. त्याआधारे अनेक उमेदवारांनी जोरदार अभ्यासही केला आहे.

अशी असेल पात्रता चाचणी
१] नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर ज्या िकमान माहितीची अपेक्षा उमेदवारांकडून केली जाते त्या माहितीवर आधारितच ही चाचणी असेल.
२] एकूण ५० गुणांची प्रश्नपत्रिका दिली जाईल. त्यावरच उत्तरे िलहिण्याची सोय असेल.
३] सर्व प्रश्न बहुपर्यायी किंवा लघुत्तरीच असतील.
४] उत्तरे निळ्या किंवा काळ्या शाईच्या बाॅल पेनने िलहायची आहेत. अन्य रंगाच्या शाईचा पेन वापरता येणार नाही.
५] परीक्षेच्या वेळी उमेदवारांना मोबाइल फोनचा वापर करता येणार नाही.

महत्त्वाच्या सूचना
१] उत्तरपत्रिकेत नाव अाणि क्रमांक लिहून स्वाक्षरी करावी लागेल.
२] उत्तरे लिहिण्यासाठी दीड तासाचा वेळ असेल.
३] उत्तर पत्रिकेत खाडाखोड टाळावी.
४] उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन अराजकीय, तटस्थ तज्ज्ञांद्वारे केले जाणार आहे.
५] निकालाबाबत शंका असल्यास मंगळवारनंतर उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत मिळेल.