आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री आज ठरवणार औरंगाबादचा महापौर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापौर,उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शनिवार शेवटचा दिवस आहे. शुक्रवार सायंकाळपर्यंत महापौरपदाचा उमेदवार निश्चित झाला नव्हता. रात्री उशिरापर्यंत नागपूर तसेच औरंगाबादेतही खलबते चालली, तरीही निर्णय झाला नाही. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, हे स्पष्ट झाले. त्यामुळे आता ‘देवेंद्र’ कोणाला पावतात, याची उत्सुकता ताणली गेली आहे.
दानवे, बागडे आणि आमदार अतुल सावे हे वेगवेगळ्या उमेदवारांसाठी अडून बसल्याने निर्णय होऊ शकला नाही. तिघांचे उमेदवार असल्याने महापौरपदाचा उमेदवार मुख्यमंत्री फडणवीस हेच ठरवणार हेही पक्के झाले. शुक्रवारी सायंकाळी नागपुरात फडणवीस यांच्या हस्ते भाजपच्या नवनियुक्त शहर जिल्हाध्यक्षांचा सत्कार सोहळा होता. तेथे यावर चर्चा होऊन निर्णय जाहीर होणे अपेक्षित होते; परंतु तसे काहीच झाले नाही. फडणवीस यांच्याकडे उमेदवार निवडीचे अधिकार गेल्याने त्यांची पसंत कोणती याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच विषयावर हरिभाऊ बागडे, मंत्री पंकजा मुंडे विनोद तावडे यांच्यातही चर्चा झाली. साडेसात वर्षांनंतर भाजपला महापौरपद मिळत असल्याने अनेकांनी यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

ज्येष्ठतेच्या मुद्द्यामुळे कोअर कमिटीची बैठक नाही... : शहराध्यक्षकिशनचंद तनवाणी अध्यक्ष असलेल्या कोअर कमिटीची बैठक झालीच नाही. समितीच्या सदस्यांची मते तेवढी फोनवरून मागवण्यात आली. प्रत्येक वेळी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होते. परंतु या वेळी ज्येष्ठतेचा मुद्दा समोर आला. या समितीत फुलंब्रीचे आमदार या नात्याने हरिभाऊ बागडे, जालना लोकसभा मतदारसंघात शहरातील काही वाॅर्ड असल्याने प्रदेशाध्यक्ष दानवे असे ज्येष्ठ सदस्य असल्याने बैठक घेण्याऐवजी त्या सदस्यांनी आपाली मते कळवावी, असे ठरले. त्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही.
बातम्या आणखी आहेत...