औरंगाबाद - मनपाचा निवडणूक विभाग आरक्षण सोडतीच्या तयारीला लागला असून शुक्रवारी सकाळी सोडतीची रंगीत तालीम करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने सोडतीसंदर्भात दिलेल्या सूचनांचीही रंगीत तालीम होणार आहे. दुसरीकडे, ११३ पैकी कोणते वॉर्ड आरक्षित होणार याबाबत विद्यमान नगरसेवकांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
मनपाची निवडणूक एप्रिल महिन्यात होत असून त्यासाठी नव्याने वॉर्डरचना करून ९९ वरून ११३ वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. आता वॉर्ड आरक्षणाची तयारी सुरू झाली आहे. ७ फेब्रुवारी रोजी संत तुकाराम नाट्यगृहात आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. त्यासाठी मनपा प्रशासन सज्ज झाले असून २५ जणांचा चमू या सोडतीच्या कामात असेल. खुद्द मनपा आयुक्त प्रकाश महाजन व उपायुक्त किशोर बोर्डे यांच्या देखरेखीखाली ही सोडत होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीबाबत बारीकसारीक सूचना मनपाला दिल्या असून त्याचे पालन करणे गरजेचे आहे. त्यानुसारच सोडत काढली जाईल. त्यात काही गडबड होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने एक प्रतिनिधी या सोडतीसाठी द्यावा, अशी विनंती मनपाच्या वतीने करण्यात आली आहे.
सोडतीकडे लक्ष
सोडत शनिवारी होणार असली तरी मनपा प्रशासन उद्या शुक्रवारी सकाळी १० वाजता त्याची रंगीत तालीम घेणार आहे. सोडतीचे सारे टप्पे सुरळीत पार पडण्यात काही अडचणी येतात का हे तपासण्याचे काम या रंगीत तालमीमुळे होईल.
तर्कवितर्क सुरू
नगरसेवकांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष आहे. आरक्षण कशा प्रकारे दिले जाईल यावर तर्कवितर्क करण्यात येत आहेत. सगळ्या वॉर्डांतून चिठ्ठ्या टाकून ड्रॉ काढणार, मागचे आरक्षण कायम ठेवणार, फक्त लोकसंख्या विचारात घेणार, मागच्या आरक्षणाचा विचार करणार नाही, असे नानाविध तर्क लढवले जात आहेत.