आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑटोरिक्षांचा आजपासून बंद, आरटीओ कार्यालयावर धडक माेर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - परवाना नूतनीकरण शुल्कवाढ रद्द करावी, सीटर रिक्षावरील बंदी उठवावी, क्रांती चौक, मोंढा नाका, सेव्हन हिल्स उड्डाण पुलांखालून ये-जा करण्यास परवानगी द्यावी, चार प्रवाशांच्या वाहतुकीस मान्यता मिळावी, खासगी बसमधील प्रवासी वाहतूक थांबवावी आदी मागण्यांसाठी रिक्षाचालक -मालकांच्या दहा संघटनांच्या वतीने सोमवारपासून तीन दिवस रिक्षांचा बंद पुकारण्यात आला आहे. बंदकाळात प्रवाशांची प्रचंड हेळसांड होणार हे स्पष्ट असल्यामुळे प्रवाशांनीही नियोजन करूनच प्रवासाला निघण्याची गरज आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने शहर बससेवेचे काटेकोर नियोजन केले असून ७० शहर बसेसच्या १५४५ फेऱ्या होणार आहेत.

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस आयुक्तांनी १५ मार्चपासून सीटर रिक्षांवर बंदी घातली आहे. उल्लंघन करणाऱ्या चालकाकडून १५०० रुपये दंड आकारण्यात येत आहे. त्याशिवाय आरटीओने परवाना शुल्कात पाच ते दहा पटीने वाढ केली आहे. याविरोधात रिक्षाचालक मालकांनी बंद पुकारला आहे. बंद काळात साडेतेरा हजार रिक्षांची चाके थांबणार आहेत. रिक्षा चालक मालक संघर्ष कृती महासंघाचा या बंदमध्ये सहभाग नसल्याने या संघटनेचे रिक्षाचालकच सोमवारी प्रवासी वाहतूक करणार आहेत. बंदमध्ये सहभागी रिक्षाचालक विद्यार्थ्यांची वाहतूक करणार नाहीत, असे या संघटनांनी स्पष्ट केले. मात्र रिक्षा चालक मालक संघर्ष कृती महासंघाचे सदस्य विद्यार्थ्यांची वाहतूक करतील, असे या संघटनेने स्पष्ट केले.

ग्रामीण भागातील बस शहरात : शहराची लोकसंख्या पंधरा लाखांवर आहे. पर्यटन, दर्शन, उद्योग, व्यवसाय, मेडिकल, शिक्षण, रोजगार आदी कामांसाठी दररोज हजारो प्रवासी दाखल होतात. प्रवासासाठी २४ हजारांवर रिक्षा, खासगी बस आणि ५१ शहर बसेसची व्यवस्था आहे. २२ ते २३ मार्चदरम्यानच्या बंद काळात साडेतेरा हजार रिक्षांची चाके थांबणार आहेत. याचे भान ठेवून एसटी महामंडळाने २७ शहर बस वाढवल्या असून बसेसची संख्या ७८ झाली आहे. या बसेसच्या १५४५ फेऱ्यांचे नियोजन केले आहे. ग्रामीण भागातील बसेस शहरात वळवण्यात आल्या आहेत.

रिक्षाचालकांच्या आंदोलनाची दिशा
सोमवारीसकाळी ११ वाजता पैठण गेट ते आरटीओ कार्यालयावर मोर्चा निघणार आहे. २२ मार्चला पैठण गेट ते पोलिस आयुक्तालय, २३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकेल. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनाचे संयोजक अध्यक्ष बुद्धिनाथ बराळ, अश्फाक सलामी, शेख नजीर, गजानन वानखेडे, राजू देहाडे, अरविंद मगरे, मिलिंद मगरे, अज्जुभाई, राजेश रावळकर, नाहेद फारुकी, शेख हारुण, शेख लतीफ, खालेद पठाण, अब्दुल रियाज समीम, जावेद पाशा, बबन बुर्कुल यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवले आहे.

पथक तैनात
प्रवाशांचीगैरसोय होऊ नये, त्यांना वेळेत बस मिळावी, प्रत्येकाने तिकीट घेऊनच प्रवास करावा याकरिता एसटी महामंडळाच्या वतीने एक पथक तैनात केले आहे. हे पथक दिवसभर विविध मार्गांवर फिरून तपासणी करणार आहे.

परीक्षा काळातच बंद
सेामवारी इयत्ता दहावीचा सकाळी ११ ते या वेळेत तृतीय भाषा मराठीचा पेपर आहे. सध्या सीबीएसई, आयसीएसई, बोर्डच्या दहावी आणि बारावीच्या तसेच काही शाळांमधील इतर वर्गांच्या परीक्षा सुरू आहेत. तसेच विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा सुरू आहेत.

विद्यार्थ्यांची वाहतूक होणार
आमच्या संघटनेचा बंदशी संबंध नाही. वर्षभर आम्ही शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सेवा दिली आहे. ऐन वेळी त्यांना वाऱ्यावर सोडून कसे चालेल ? याचा सारासार विचार करूनच विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे अडीच ते तीन हजार रिक्षा सुरू ठेवणार आहोत. - निसार अहमद खान, अध्यक्ष,रिक्षा चालक-मालक संघर्ष कृती महासंघ.

आमचा कडकडीत बंद
साडेतेराहजार रिक्षाचालक सदस्यांनी जाचक नियमांविरुद्ध तीन दिवस बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. तिन्ही दिवस कडकडीत बंद पाळण्यात येईल. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रिक्षा सुरू ठेवल्या असत्या, पण कुणी दगडफेक केल्यास मुले जखमी होतील. त्यामुळे शालेय रिक्षाही बंद राहतील. - बुद्धिनाथ बराळ, अध्यक्ष,लाल बावटा रिक्षा संघटना.
बातम्या आणखी आहेत...