आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Water Of Darana Come In Nandur Medhmeshwar

आज येणार नांदूर मधमेश्‍वर कालव्यात दारणाचे पाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर - गंगापूर, वैजापूर तालुकावासीयांची तहान भागवण्यासाठी नांदूर मधमेश्वर कालव्यात (नांमका) दारणा धरणातून 850 दशलक्ष घनफूट पाणी मंगळवारी सकाळी सोडले जाणार आहे. पाणी चोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दर पाच किलोमीटर अंतरावर एक पथक तैनात करण्यात आले आहे. यामध्ये पोलिस अधिका-यांचाही समावेश आहे.
नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्यातूनही प्रथमच औरंगाबाद जिल्ह्यास पाणी दिले जाणार आहे. मनमाड आणि येवल्यास पालखेडमधून सोडण्यात आलेल्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर दारणातून सोडण्यात येणा-या पाण्याची चोरी होऊ नये, यासाठी कालव्यांवर पथकांची नेमणूक करत काळजी घेतली जात आहे. यासाठी नियुक्त पथकांमध्ये पोलिस, पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, वीज महावितरण कंपनीच्या कर्मचा-यांचा समावेश आहे.

69 गावतळी भरणार : एकूण 850 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असले तरीही प्रत्यक्षात 450 दशलक्ष घनफूट पाणीच औरंगाबादला पोहोचणार आहे. या पाण्यात गंगापूर व वैजापूर तालुक्यांतील 69 तळी भरली जाणार आहे. या तळ्यांपर्यंत पाणी जलद कालव्यावरून करण्यात आलेल्या चा-यांद्वारे पोहोचेल. विभागीय आयुक्तांनी पाण्याबाबत मागणीचा प्रस्ताव शासनास दिला होता. त्यावर शासनाने खास बाब म्हणून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, हे पाणी कुठून सोडायचे याची निश्चिती होत नसल्याने हा निर्णय लांबणीवर पडला होता.

असे पोहोचेल पाणी
दारणातून सोडण्यात येणारे पाणी प्रथम चेहडी बंधा-यात सोडले जाईल. तेथून ते कालव्याद्वारे नांदूर-मधमेश्वर धरणात पोहोचेल. त्यानंतर 130 कि.मी.च्या जलद कालव्याद्वारे गंगापूर व वैजापूर तालुक्यात पोहोचेल.