आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूत्र विसर्जनाचा मार्ग सुलभ करणारी युरो पँट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तुम्ही प्रवासात आहात. बाहेर धो धो पाऊस पडतोय. तुमच्याबरोबर वृद्ध आहेत. ट्रॅफिक जाममध्ये अडकलात. रस्त्यावर गुडघ्याइतके पाणी. तुम्हाला खाली उतरण्याची संधी नाही. अशावेळी वृद्धांना दोन ते तीन तास एका जागी बसणे असह्य होऊन जाते. त्यांना लघवीची समस्या जाणवते. मात्र, यावर आता युरो पँटचा सोपा व उपयु्क्त पर्याय औरंगाबादेतील हेडगेवार रुग्णालयातील डॉ. प्रसाद वैद्य यांनी शोधला आहे. त्यांनी युरो पँटच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे.
युरो पँटची संकल्पना कशी सुचली याबाबत डॉ. वैद्य यांनी सांगितले, आम्ही एकदा सहकुटुंब मुंबईला गेलो होतो. तेथे मुसळधार पाऊस होता. परळ भागात ट्रॅफीक जॅममध्ये आम्ही अडकलो. हालायला जागाच नाही. असेच दोन एक तास गेले. सहप्रवाशाना जाम लघवी लागली. त्यांची अवस्था अत्यंत वाईट होती. मात्र रस्त्यावर पाणी आणि वाहतुकीची कोंडी यामुळे जागेवर बसण्याशिवाय पर्यायच नव्हता. अनेक प्रवाशांना जागेवरच लघुशंका उरकावी लागली. ज्येष्ठ नागरिकांची अवस्था तर याहून बिकट झाली. भारतासारख्या देशात असे प्रकार अनेकदा घडतात. यावर उपाय काय असा विचार करताना एक सोपा, साधा व सुटसुटीत पर्याय असावा असे वाटले. त्यादृष्टीने कामाला लागलो आणि दोन वर्षे सातत्याने काम केल्यानंतर युरो पँट आकारास आली. युरो पँट तयार करताना पत्नी भावना वैद्य व प्रशांत औसेकर यांची मोलाची मदत झाल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले.
उपयुक्त पर्याय
मूत्र संबंधी समस्येवर सध्या बाजारात कॅथेटर्स व कंडोम कॅथेटर्स हे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र कॅथेटर्समुळे इन्फेक्शनची शक्यता खूप असते. तर कंडोम कॅथेटर्स एकतर महिलांसाठी उपयोगी नाहीत शिवाय त्याच्या वापरावर अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे युरो पँट हा लहान मुले, महिला, पुरुष, वृध्द, कामगार, शेतकरी, उद्योजक अशा सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त पर्याय असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले. वृध्दाश्रमातील वृध्दांना ही पँट वापरण्यास दिली, याचा चांगला फायदा झाल्याच्या प्रतिक्रिया मिळाल्या. युरो पँटच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. तसेच ट्रेड मार्क मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. वैद्य यांनी स्पष्ट केले.

अशी आहे युरो पँट
डॉ. वैद्य यांनी सांगितले, युरो पँटची रचना साध्या चड्‌डीप्रमाणे आहे. छत्रीच्या कापडाचे दोन थर, चड्‌डीप्रमाणे आकार, त्याला मूत्र वहनासाठी पाइप व मूत्र संचयासाठी साधी पिशवी अशी सोपी रचना आहे. युरो पँट घालून तुम्हाला कोणतेही दैनंदिन काम विनासायास करता येते. गुरुत्वाकर्षण तत्त्वावर युरो पँट काम करते. त्यामुळे मूत्र परत येण्याची, सांडण्याची, त्यामुळे घाण वाटण्याची शक्यता नाही, वास येत नाही. चड्‌डीप्रमाणे युरो पँट घालायची , पिशवी पोटरीला बांधायची, उंचीनुसार पाइप खालीवर करता येतो व दैनंदिन कामे विनासायास करायची अशी युरो पँटची रचना आहे.
फायदा काय
{दीर्घ प्रवासात अत्यंत उपयुक्त
{ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांसाठी उपयोगी
{अल्झायमर, लकवा, वारंवार लघवीस लागणे आदी रुग्णांसाठी फायदेशीर
{मूत्र विसर्जनावर नियंत्रण नसणाऱ्या रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त
{किफायतशीर, इन्फेक्शन न होणे, वास न येणे आदीमुळे सुलभ.

वैशिष्ट्ये
~५०० रु. किंमत
~२० रु. अतिरिक्त पिशवीची किंमत
१.५ लिटर क्षमता
३०० मिली लिटर एकावेळी मूत्र विसर्जन