आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्लासभर पाण्यात महिनाभर जगतात रोपटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दिवसेंदिवस वाढती पाणीटंचाई आणि पर्यावरणाचा होत असलेला ºहास या पार्श्वभूमीवर कमी जागा आणि कमी पाण्यात वनस्पती जगवणे ‘टेरारियम’ प्रयोगाने शक्य होणार आहे. हवाबंद वातावरणात अवघ्या ग्लासभर पाण्यात महिनाभर झाडे जगविणा-या या प्रयोगाने सरस्वती भुवनच्या विद्यार्थिंनींना राष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळाला.

इयत्ता बारावीच्या विद्यार्थिंनी प्रियंका टेके आणि माधुरी देशपांडे यांनी महाविद्यालयातील प्रा. मनोहर जाधव, प्रा. बाबासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली टेरारियम हा प्रयोग सादर केला. तालुका, जिल्हास्तरावर या प्रयोगाचे कौतुक झाले आहे.

4 ते 8 जानेवारीदरम्यान कोलकाता येथे आयोजित चिल्ड्रन्स सायन्स काँग्रेसचे उद्घाटन माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते झाले होते. अब्दुल कलाम आणि उपस्थित राजदूतांनी अतिशय उत्सुकतेने या प्रयोगाबद्दल जाणून घेतल्याचे प्रा. जाधव यांनी सांगितले.

सिल्व्हासा येथे डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या राज्यस्तरीय प्रदर्शनात ‘टेरारियम’ प्रयोगाची विशेष दखल घेण्यात आली. यातून अत्यंत सोप्या पद्धतीने घरच्या घरी पालेभाज्या, शोभेची झाडे तसेच औषधी वनस्पती वाढवणे शक्य आहे. महाविद्यालयाने प्रथमच राज्यस्तरीय प्रदर्शनात सहभाग घेतला. दोन्ही मुली असलेला हा एकमेव संघ होता.

काय आहे टेरारियम ?
टेरारियम म्हणजे हवाबंद डबा किंवा कमी जागेत अत्यंत कमी पाण्यामध्ये उत्तमरीत्या रोपांची, झाडांची उगवण आणि जपणूक करण्याचे तंत्र.

प्रयोगामागे जुने शास्त्र - टेरारियमच्या माध्यमातून केलेल्या या प्रयोगामागे अतिशय जुने शास्त्र आहे. ते काळाच्या पडद्याआड गेल्याने अनेकांना याविषयी माहिती नाही. या प्रयोगातून पाण्याची बचत, जमिनीचे संवर्धन आणि जागेअभावी झाडे लावण्याची इच्छाही पूर्ण करता येऊ शकते.

आत्मविश्वास वाढला - आपल्या प्रयोगाबाबत इतरांना समजावून सांगणे, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे कशी द्यायची हे शिकायला मिळाले. यामुळे आत्मविश्वास वाढला आहे. माधुरी देशपांडे, विद्यार्थिनी

प्रयोगशीलता शिकलो - या प्रयोगाच्या माध्यमातून आपल्या शिक्षणाचा वापर दैनंदिन जीवनात कसा करता येऊ शकतो, हे शिकायला मिळाले. या प्रयोगातून अनेक प्रकारच्या वनस्पती कमी पाण्यात जगविण्याचे स्वप्न सहज पूर्ण होईल.’’ - प्रियंका टेके, विद्यार्थिनी

कसे बनवायचे टेरारियम - हवाबंद बाटली किंवा अ‍ॅक्वेरियममध्ये वाळू किंवा विटांचा चुरा, कोळशाचे तुकडे आणि शेवटी मॉसचा थर दिला जातो. यावर सुपीक माती टाकून रोपे लावतात. वाळू आणि विटांच्या थरातून पाण्याचा निचरा होतो. कोळशातून आर्द्रता मिळते, तर मॉसमुळे बाष्प टिकून राहते.

असे आहेत फायदे
पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत.
कमी जागेत रोपे वाढवता येतात.
मेथी, पत्ताकोबी, कोथिंबीर, कढीपत्ता पुदीना आदी उत्पादन घेणे शक्य.
रासायनिक खतांची गरज नाही.