आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छावणीत गॅस्ट्रोची साथ सुरूच, एकूण 2600 रुग्ण, उपचार सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दूषित पाण्यामुळे छावणीत गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. सोमवारी रुग्णांचा आकडा २६०० वर पोहोचला. छावणी सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय रुग्णालय, मिलिटरी रुग्णालयासह मनपाचे डॉक्टर रुग्णांवर उपचार करत आहे. सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉ. विनोद धामंदे यांनी दिली. सोमवारी सायंकाळी ३५ रुग्णांवर उपचार सुरू होते. 

शुक्रवारी (१० नोव्हेंबर) छावणीतील रुग्णालयात जुलाब, उलट्यांचा त्रास होणारे ते १० रुग्ण आले. शनिवारी २५० जणांना गॅस्ट्राेची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. रविवारी हा आकडा ९३८ वर पोहाेचला आणि सोमवारी सायंकाळपर्यंत २६०० रुग्णांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यापैकी १२०० रुग्णांना दाखल करून उपचार करण्यात आले. 

आज येणार नॅशनल स्कूल ऑफ व्हायरॉलॉजीची टीम
अचानकपणेशेकडो लोकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने याची दखल घेत, पुण्याच्या नॅशलन स्कूल ऑफ व्हायरॉलॉजीची टीम मंगळवारी छावणी रुग्णालयात दाखल होणार आहे. रुग्णांच्या शौचाचे नमुने घेऊन साथ नेमकी कशामुळे पसरली याचा शोध घेतला जाईल. 

दरम्यान, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बाबा तायडे, अकील पटेल, काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष खालेद पठाण, छावणी विकास युवा मंचचे मयंक पांडे, शेख कासीम, राॅबीन बत्तीसे,जयपाल दवणे, अरुण नंदागवळी ,भगवान गवई, असमत खान, नईम बेग, सय्यद लईकोद्दीन, शेख जाकीर, अलमान खान, अय्याज खान, सय्यद अझहर, शेख माजिद यांनी रुग्णालयास भेट दिली. 

छावणीतील पाण्याची तपासणी करण्याचे आदेश 
छावणीपरिषदेला देण्यात येणारे पाणी हे मनपाचेच आहे. तेव्हा मनपाने येथील पाण्याचे नमुने घेऊन त्याची तपासणी करावी, त्याचबरोबर छावणी मनपाच्या हद्दीत येत नसली तरी माणुसकीच्या भावनेतून त्यांना आरोग्य कर्मचारी तसेच औषधी उपलब्ध करून द्यावी, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी दिले. घोडेले यांनी सकाळी छावणी येथील रुग्णालयात रुग्णांची भेट घेतली. पाण्याच्या वितरणात गडबड झाल्याने हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज असला तरी मनपाच्या वतीने पाण्याचे नमुने घेऊन त्याची तपासणी करावी, असे आदेश त्यांनी आरोग्य विभागाला दिले. 

नेत्यांनी केली पाहणी 
रुग्णांचीसंख्या हजारांवर पोहोचल्याने काँग्रेस, शिवसेना, भाजपच्या नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली. खासदार चंद्रकांत खैरे यांनी रुग्णांची चौकशी केली. रुग्णालयात काय मदत हवी आहे, याचीही माहिती घेतली. आमदार अतुल सावे आणि माजी आमदार एम. एम. शेख यांनीही भेट दिली. या वेळी घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर उपस्थित होत्या.
बातम्या आणखी आहेत...