आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा वर्षांत मनपाने लावली पाच लाख रोपटी, तरीही एकूण झाडे पाच लाखच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- २०११ पासून २०१७ पर्यंत मनपा, नागरिकांनी शहरात ५ लाख १० हजार २७४ रोपटी लावली, तरीही मनपाने गेल्या वर्षी केलेल्या सर्वेक्षणात शहरातील झाडांची संख्या ५ लाखांच्या आसपास असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे २०११ पूर्वी लावलेली झाडे कुठे गेली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे एका झाडाचा विस्तार सरासरी २० चौरस फूट (मोठ्या झाडांचा ४० चौरस फुटांपेक्षाही जास्त असतो) गृहीत धरला तर सहा वर्षांत लागवड करण्यात आलेल्या झाडांमुळे ४ हजार ६९५ एकर जागा व्यापली जाणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात दोन ते तीन हजार फूट उंचीवरून शहर हिरवेगार दिसायला हवे, परंतु प्रत्यक्षात ते ओकेबोकेच दिसते.
 
गेल्या २५ वर्षांपासून दर पावसाळ्यात मनपा नागरिकांकडून वृक्षारोपण केले जाते. २०११ मध्ये शहरातील झाडांची संख्या ही साडेचार लाख एवढी होती. ती आता पाच लाखांच्या आसपास असल्याचे सांगण्यात येते. मग गेल्या पाच वर्षांतील ५ लाख रोपट्यांचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला असता नागरिकांनी मनपाकडून नेलेल्या रोपट्यांची लागवड केली नसावी, असा दावा केला जात आहे.

कशामुळे झाले हे?
पावसाळ्यात अनेक पक्ष, संघटना वृक्षारोपण कार्यक्रम घेतात. मनपा या संस्थांना नि:शुल्क रोपे देते. वृक्षारोपण मोठ्या धूमधडाक्यात होते. त्याचे फोटोही वृत्तपत्रात प्रसिद्ध होतात. मात्र, वृक्षारोपण करणारे दुसऱ्याच दिवशी विसरून जातात. त्या रोपांकडे कोणीही लक्ष देत नाहीत. दुसऱ्या वर्षी तिथेच वृक्षारोपण केले जाते, असे मनपा अधिकारी सांगतात.

जाळ्यांची चोरी
रोपांच्या संरक्षणासाठी मनपाकडून संरक्षक जाळी (ट्री गार्ड) दिली जाते. ती लोखंडाची असेल तर काही दिवसांत चोरीस जाते. बांबू किंवा लाकडाची असेल तर तुटलेली दिसते.

काय करायला हवे?
संगोपनाची हमी देणाऱ्यांनाच रोपे दिली जावी. दिलेल्यापैकी किती झाडे जगली याचा अहवाल दरवर्षी मागावा. दरवर्षी वृक्षमोजणी करावी.

आॅडिट आवश्यक
राजकीय पक्ष, काही संस्था, संघटना फॅशन म्हणून वृक्षारोपण करतात अन् दुसऱ्याच दिवशी विसरून जातात. त्यामुळे रोपणाचे आकडे फुगलेले दिसतात. मनपाने रोपटी विक्री केली तरच त्याची किंमत कळेल. उद्यान विभागाने किती झाडे जगली, याचे ऑडिट केले तरच झाडे वाचण्याचे प्रमाण वाढेल.
- जनार्दन भडके, निवृत्त उद्यान अधीक्षक

पुणे कसे हिरवे झाले?
पुणे मनपा नागरिकांनी रोपटी नव्हे, तर ८ ते १० फूट वाढलेली झाडे देते. त्यातही जनावरे खाणार नाही अशीच झाडे दिली जातात. राजकीय पक्ष, संघटना, संस्था स्वतःहून किती झाडे टिकली याची नोंद ठेवत राहतात.
बातम्या आणखी आहेत...