आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचोड, आपेगाव, दावरवाडी, पिंपळवाडीत कांटे की टक्कर; प्रचाराच्या तोफा थंडावल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा  संपला असून आता साम, दाम देत मतदान आपल्याकडे वळवण्याचा पैशांचा खेळ सुरू झाला आहे. बुधवारी रात्री हा खेळ रंगणार असून याकडे पोलिसांचे विशेष लक्ष राहणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली. 
 
पैठणमधील ९ जिल्हा परिषद, १८ पंचायत समितीच्या गणासाठी गुरुवारी मतदान पार पडत आहे. २ लाख २ हजार ८२८ मतदार आपला हक्क बजावणार असून पहिल्यांदाच भाजप व शिवसेना युती तुटल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक वेगवेगळ्या लढत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या चुली ही वेगवेगळ्या मांडल्याने मिनी मंत्रालय कोणाच्या ताब्यात जाणार याची उत्सुकता मतदारांना लागली आहे. आमदार संदिपान भुमरे यांची पाचोड या ठिकाणी पुत्र विलास भुमरे यांच्यासमोर राष्ट्रवादीचे उमेदवार विलास शेळके यांनी आवाहन उभे केल्याने आमदार पुत्र या ठिकाणाहून विजय होतात का याकडे तालुक्याचे लक्ष लागले.
 
आपेगाव येथे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या सुनबाई उभ्या असून या ठिकाणी राष्ट्रवादी, शिवसेनेच्या उमेदवाराशी मुख्य लढत होणार आहे, तर पिंपळवाडी या ठिकाणी राष्ट्रवादीच्या  पद्मा गोरे, शिवसेनाच्या मनीषा सोलाट यांच्यात लढत होणार आहे. दावरवाडी हा गट एससी महिलांसाठी राखीव असून या ठिकाणी भाजप, राष्ट्रवादीत लढत होताना दिसत आहे. त्यात हा गट काँग्रेसचे रवींद्र काळे यांचा असल्याने त्यानी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सभा घेऊन काँग्रेसला बळ दिले असले तरी सर्व उमेदवार तगडे असल्याने या ठिकाणी कोण बाजी मारणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
 
मनसे खाते खोलणार का?  
मनसेला रामराम ठोकत डॉ. सुनील शिंदे भाजपत दाखल झाले. मनसेचा बिडकीनमधील एक गट निवडणूक लढत असून मनसेला या ठिकाणी यश मिळेल, असे वाटत असल्याने मनसे खाते खोलणार का, याकडे जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्याचे लक्ष लागले आहे.  
 
पैसे वाटपाचे लोण ग्रामीण भागात 
नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत एक मत हजार ते दोन हजारांवर चालल्याची चर्चा होती.  आता हेच लोण ग्रामीण भागात आले असून मतदार ही कोणाकडून काही मिळते का याची वाट पाहताना दिसत आहे. पुढील २४ तासांत मताला किती भाव ही बाब समोर येईलच.  
 
सरकार कधीही कोसळू शकते म्हणून नेते मैदानात: सध्या शिवसेना-भाजपमध्ये तू तू - मैं मैं सुरू असून हे सरकार कधीही कोसळेल यासाठी आता जिल्हा परिषदच्या प्रचाराच्या माध्यमातून आमदारकी लढवणारे  इच्छुक डोअर टू डोअर प्रचार करताना दिसत आहेत.
बातम्या आणखी आहेत...