आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसला शह देण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा-देवळाई नगर परिषद निवडणुकीत वॉर्ड क्र. ८ मध्ये काँग्रेसला शह देण्यासाठी शिवसेना, भाजपबरोबरच इतरही पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांना जोर लावावा लागणार आहे. हा वॉर्ड अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे माजी ग्रामपंचायत सदस्य बाबूराव जाधव यांची पत्नी ताराबाई जाधव या वॉर्डातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढणार, हे पक्के मानले जात आहे. मागील तीस वर्षांपासून जाधव काँग्रेस पक्षाचे काम करीत असल्यामुळे त्यांचा या वॉर्डात चांगला दरारा आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवाराला पराभूत करण्यासाठी शिवसेना, भाजप उमेदवारांना प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.

या वॉर्डातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या रंजना विश्वास जाधव या मागील काही वर्षांपासून राजकारणात सक्रिय नाहीत. त्या काँग्रेसकडून तिकीट मिळवणार किंवा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. एमआयएमकडूनही उमेदवार दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे. या पक्षाकडून मीरा देशमुख यांचे नाव चर्चेत आहे; परंतु अजूनही त्याबाबत उघडपणे कोणीही बोलताना दिसत नाही. दरम्यान, शिवसेना- भाजपकडूनही तोडीचा उमेदवार देण्याचे प्रयत्न आहेत. मात्र, अजून तरी कोणाचेही नाव पुढे आले नाही.

असा आहे वॉर्ड
वॉर्ड क्रमांक ८ च्या पूर्वेला देवळाई तांडा असून या ठिकाणी तुरळक वसाहत आहे. पश्चिमेला खाजानगर, विठ्ठलनगर, तर दक्षिणेला डोंगराळ भाग आहे. उत्तरेला देवळाईचा भाग आहे. जमतेम १२०० लोकसंख्या असल्यामुळे उमेदवारांना मतदारांना भेटण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

दलित मते अधिक
सातारा-देवळाई नगर परिषद निवडणुकीत जातनिहाय मतांची आकडेमोड केली जात आहे. वॉर्ड क्रमांक ८ मध्ये ५० घरांपेक्षा जास्त अनुसूचित जाती प्रवर्गातील घरांची संख्या आहे. ७० टक्के लोकसंख्या मुस्लिम व ओबीसी असल्यामुळे भाजपला या भागात मते खेचणे जड जाणार आहे.
नवख्यालाही संधी
वॉर्ड क्रमांक ८ मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून बाबूराव जाधव हे काँग्रेसकडून निवडून आले होते. त्यांचा या भागात चांगला जनसंपर्क आहे. मात्र, वॉर्डातील मूलभूत समस्यांमुळे नवख्या उमेदवारालाही चांगली संधी आहे. त्यामुळे काँग्रेस वगळता इतर पक्ष किंवा अपक्षही या वॉर्डासाठी जोर लावतील, अश चर्चा होत आहे.