आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्याने घोषणा केली तोच जीआर!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादला राज्याची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्याला आठ वर्षे उलटली; परंतु याबाबत अद्याप जीआर निघाला नाही. यासंबंधी राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांना ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने प्रश्न विचारला असता रावल यांनी मंत्र्याने घोषणा केली तोच जीआर असतो. आमच्या शब्दाला काही महत्त्व असते की नाही, असा प्रतिप्रश्न करून अधिक बोलणे टाळले. दरम्यान, औरंगाबादेतील पर्यटनाला चालना देण्यासाठी लवकरच जयपूर आणि गोव्याहून विमानसेवा सुरू करण्याची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
वेरूळ महोत्सवानिमित्त रावल शहरात आले आहेत. शनिवारी त्यांनी बीबी का मकबरा, पाणचक्की आणि औरंगाबाद लेणीला भेट दिली. रावल म्हणाले, आधी केंद्र शासनाच्या हृदय योजनेअंतर्गत आणि नंतर युनेस्कोच्या योजनेअंतर्गत शहराला हेरिटेज दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्य आणि केंद्राचे सांस्कृतिक खाते ही जबाबदारी पार पाडेल. पण हेरिटेज सिटीसाठी शहरातील ऐतिहासिक स्थळे अतिक्रमणमुक्त असणे आवश्यक आहे. ते काम महापालिकेलाच करावे लागेल. पर्यटन विभागाचे उपसंचालक कार्यालय औरंगाबादेत राहणार आहे. मात्र, त्यामुळे पर्यटन विकास महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झालेली भीती व्यर्थ असून ती आम्ही दूर करू, असे त्यांनी सांगितले.

जयपूर,गोवा विमानसेवा : ३०वर्षांपूर्वी उदयपूर-औरंगाबाद ही एअर इंडियाची विमानसेवा होती. परंतु ती बंद झाल्यामुळे उत्तर भारतातील पर्यटक येथे कमी झाले. दिल्ली, जयपूर आणि औरंगाबाद ही तीन शहरे ऐतिहासिक, पुरातत्त्वदृष्ट्या महत्त्वाची आहेत. दिल्लीतील पर्यटक जयपूर आणि तेथून औरंगाबादेत यावा यासाठी एअर इंडियाशी बोलणी अंतिम टप्प्यात आहे. गोव्यासाठीही विमानसेवा सुरू करण्याबाबत बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
एका संस्थेला कार्यक्रम नाही

वेरूळमहोत्सवाची ७० टक्के तिकिटे, पत्रिका एका खासगी संस्थेकडे दिल्याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यावर सारवासारव करताना रावल म्हणाले की, ही स्थानिक नियोजन समितीची चूक आहे. याबाबत त्यांना निश्चित जाब विचारू. पण यापुढे कुणा एका संस्थेला असे अधिकार देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...