आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटन संवर्धनाच्या बैठकीत फक्त ‘फिर मिलेंगे’चा निर्णय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबादला पर्यटन राजधानी म्हणून घोषित होऊन तीन वष्रे होत आली आहे. मात्र, पर्यटनाच्या विकासासाठी हव्या तशा कुठल्याच सुविधा होताना दिसत नाही. ही परिस्थिती बदलावी या करिता सीआयआयने (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) मंगळवारी (तीन सप्टेंबर) शहरातील उद्योजक, कलावंत, प्रशासकीय अधिकारी, इतिहासतज्ज्ञ, गाइड असोसिएशनच्या सदस्यांची व्यापक बैठक आयोजित केली होती. त्यात अनेक सूचना आल्या. मात्र, ‘फिर मिलेंगे’ या पलीकडे कोणताही ठोस निर्णय झाला नाही. जिल्हा प्रशासनाच्या प्राधान्य यादीत पर्यटनाचा समावेश नसल्याचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी स्पष्ट केल्याने अनेकांना धक्का बसला.

ऐतिहासिक स्थळांची गर्दी असलेल्या औरंगाबाद शहराला 2010 मध्ये पर्यटन राजधानी घोषित करण्यात आले. दीड वर्षापूर्वी पर्यटन प्राधिकरणाला तत्त्वत: मान्यताही देण्यात आली. मात्र, त्यापुढे कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. 52 दरवाजांचे शहर म्हणून परिचित असलेल्या औरंगाबादेत केवळ 13 दरवाजे उरले आहेत. पर्यटकांसाठी कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत. रस्त्याची दयनीय अवस्था आहे. स्थानिकांना वारसा स्थळांविषयी स्वाभिमान नाही. पर्यटनक्षेत्र उद्योगाचे सक्षम साधन बनू शकते, असे फक्त म्हटले जाते. या सार्‍या मुद्दय़ांवर विचारमंथन करून काही पावले उचलण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. चार तास चाललेल्या या बैठकीत नियोजनाकडे दुर्लक्षच झाले. याबद्दल ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांनी नाराजीही व्यक्त केली. ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून शहराच्या पर्यटन क्षेत्र विकासासाठी बर्‍याच बैठका, चर्चा झाल्या. मात्र, अद्याप भरीव यश नाही.

कोण होते उपस्थित : सीआयआयचे अध्यक्ष ऋषी बागला, उपाध्यक्ष प्रशांत देशपांडे, उद्योजक राम भोगले, मानसिंग पवार, उल्हास गवळी, आर्किटेक्ट अजय कुलकर्णी, इतिहासतज्ज्ञ डॉ. आर. एस मोरवंचीकर, सीएमआयएचे सचिव मुनीश शर्मा, हॉटेल असोसिएशनचे प्रमुख हरप्रीत सिंग, उद्योजक मिलिंद कंक, टूर ऑपरेटर असोसिएशनचे जसवंत सिंग, जेट ऐअरवेजचे जमील अहमद, कुलथूकुमार, धनंजय देशपांडे, सुभाष जाधव, कथ्थक नृत्यांगना पार्वती दत्ता, दुलारी कुरेशी, एमजीएम हॉटेल मॅनेजमेंटच्या राजलक्ष्मी भोसले, गाइड असोसिएशनचे अमोल बासुले, आर.नाडकर्णी, एमटीडीसीचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, एअर इंडियाचे वसंत बर्डीकर, अमोल मोहिते.

अशा केल्या सूचना
0 पर्यटनस्थळावरील छोट्या व्यापार्‍यांना, भिकार्‍यांना प्रशिक्षण द्यावे.
0 विदेशींसोबत स्थानिक पर्यटकांची काळजी घ्यावी.
0 भारतातील इतर पर्यटनस्थळांवर, औरंगाबादेतही माहिती स्टॉल असावेत.
0 सामान्य नागरिकांचाही पर्यटन संवर्धन उपक्रमात सहभाग हवा.
0 शाळांमध्ये शहरातील पर्यटनस्थळांची माहिती द्यावी.
0 ऐतिहासिक स्थळांसोबत ऐतिहासिक कलांनाही प्राधान्य द्यावे.
0 कलाग्रामचा विकास, मार्केटिंग करावे.
0 जिल्हा पर्यटन मित्र फोरम, टुरिस्ट पोलिस यंत्रणा, पर्यटनस्थळांसाठी वन विंडो तिकीट व्यवस्था हवी.
0 रात्रीचे औरंगाबाद संकल्पना राबवावी.
0 वेरूळ महोत्सवात सातत्य हवे. महोत्सवाच्या तारखा वर्षभर आधी जाहीर कराव्यात.

गाइड असोसिएशन, एमजीएमचा पुढाकार
शिर्डीला जाण्यासाठी रोज किमान 700 पर्यटक औरंगाबादला येतात. शिर्डीत विमानतळ झाल्यावर औरंगाबादमार्गे जाणार्‍या पर्यटकांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे, विमान आणि बसच्या माध्यमातून शहराला अधिक सक्षम पद्धतीने जोडणे आवश्यक आहे, असेही मत मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना पर्यटनाचे महत्त्व, पर्यटनस्थळाची माहिती देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन गाइड असोसिएशन, एमजीएमच्या हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाने दिले. मात्र, या कामाची सुरुवात कधी होणार हे सांगितले नाही. पर्यटनस्थळांच्या वन विंडो तिकीट यंत्रणेसाठी प्रयत्न करू, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

प्राथमिकता वेगळी
जिल्हा प्रशासन सध्या शिक्षण, आरोग्य आणि अन्न पुरवठय़ावर काम करत आहे. पर्यटनाच्या विकासासाठी नागरिक, उद्योजकांनी पुढाकार घ्यावा. सहकार्य केले जाईल. विक्रम कुमार, जिल्हाधिकारी औरंगाबाद

काम होणे आवश्यक
नियोजनासाठी चर्चा आवश्यक असल्या तरी बैठका केवळ चर्चेपुरत्या र्मयादित राहू नयेत. त्यात ठोस निर्णय झाले तर सामान्य नागरिकही त्यात सहभागी होतील. डॉ. किशोर पाठक, पर्यटन प्रेमी.

हे पहिले पाऊल,पुढील काळ सकारात्मक
जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी सीआयआयच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. आजची बैठक पहिले पाऊल होते. यापुढील काळात काही सकारात्मक घडेल, अशी अपेक्षा आहे. ऋषी बागला, अध्यक्ष, सीआयआय