आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त औरंगाबाद कशाला, संपूर्ण मराठवाड्याचा विचार करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नागपूरला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा देताना पूर्ण विदर्भासह मध्य प्रदेशातील ठिकाणांचाही उल्लेख करण्यात आला. औरंगाबादचा उल्लेख करताना मात्र मराठवाड्यातील पर्यटनस्थळांना डावलले, असा आरोप शहरातील पर्यटनप्रेमींनी केला आहे. औरंगाबादसह मराठवाड्यात धार्मिक, वन पर्यटनाची महत्त्वपूर्ण ठिकाणे असून शासनाने या स्थळांची माहिती पर्यटक, जिज्ञासूंपर्यंत पोहोचवावी, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पर्यटन जिल्हा म्हणून नागपूरचा मागच्या दाराने समावेश केल्यामुळे पर्यटन जिल्ह्यांसाठीच्या निधीत औरंगाबाद आणि सिंधुदुर्गानंतर आणखी एक वाटेकरी निर्माण झाला. नागपूरचा समावेश करतानाच विदर्भात पर्यटनवृद्धीसाठी १२ योजनांचा आराखडाही तयार केला असून याबाबत दिव्य मराठी’ने प्रकाशित केलेल्या वृत्तावर आलेल्या या प्रातिनिधिक प्रतिक्रिया....
...एक होते अौरंगाबाद
^युनेस्कोने ताजमहालापूर्वी वेरूळ, अजिंठा लेणींना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला. त्यांना आपले महत्त्व पटले; पण राज्यकर्त्यांना हे लक्षात येत नाही. मुळातच औरंगाबादला कोणी मायबाप नाही. मुख्यमंत्री नागपुरातील असल्याने आमच्या वाट्याचे सर्वकाही तेथे नेण्याचा धडाका लावला आहे. अशीच स्थिती राहिली तर औरंगाबाद ही विकासापासून दूर असणारी हेरिटेज सिटी असेच म्हणावे लागेल. एक होते औरंगाबाद असा याचा उल्लेख करण्याची वेळ येईल. -जसवंतसिंग, अध्यक्ष, टूरिस्ट प्रमोटर्स गिल्ड

मराठवाडाच ठरेल सरस
^सत्ता कोणाचीही असो मराठवाड्यावर नेहमीच अन्याय झाला आहे. आतीही सर्व चांगल्या योजना नागपुरात जाणार असतील तर मराठवाड्याने काय करायचे? तुलना करायचीच झाली तर पर्यटनाच्या तुलनेत मराठवाडाच सरस ठरेल. या आधारावरच शासनाने औरंगाबादला पर्यटन राजधानी आणि पर्यटन जिल्हा हा दर्जा दिला. आता त्यात आणखी वाढ करण्याऐवजी नागपूराला १२ योजना, तर आपल्यासाठी केवळ दोन त्याही जुन्याच योजना देण्यात आल्या आहेत. याविरुद्ध आवाज उठवण्याची गरज आहे. -प्रियेशराणे, विद्यार्थी

वैभव कधी समोर येणार?
^नागपुरातील पर्यटनस्थळांची यादी मांडताना त्यात मध्य प्रदेशातील काही स्थळांचाही उल्लेख केला जातो. मात्र, औरंगाबादचा नेहमी एकट्याचा विचार होतो. वास्तविक पाहता मराठवाडा पर्यटनासाठी अत्यंत अनुकूल ठिकाण आहे. तुळजापूर, अंबाजोगाई, माहूर, औंढा नागनाथ, परळी वैद्यनाथ, नांदेडचा गुरुद्वारा, तेर, धाराशीव लेणी या ठिकाणांची माहिती जगासमोर कधी पोहोचणार? नागपूरला दर्जा दिल्याचा आनंदच आहे, पण मराठवाड्याकडे दुर्लक्ष करू नका, -भारत गजेंद्र गडकर, ज्येष्ठ पत्रकार आणि अभ्यासक
बातम्या आणखी आहेत...