औरंगाबाद - जपानमधील टोकियोतून अजिंठा लेणी आणि इतर पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकाची बॅग बसमधून चोरी गेल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी उघडकीस अाली. निहारा कजुकी असे या पर्यटकाचे नाव असून त्यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निहारा २२ सप्टेंबर रोजी मुंबईहून ट्रॅव्हल्सने शहारात येण्यासाठी निघाले. २३ सप्टेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्स शहरात पोहाेचली. सामान घेताना त्यांनी बॅगची पाहणी केली असता त्यातील लॅपटॉप आणि कॅमेरा असे ३३ हजार रुपयांचे साहित्य गायब असल्याचे त्यांना दिसले. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक काचमांडे करीत आहेत.
बसमध्ये होणाऱ्या चोऱ्यांचे पोलिसांसमोर आव्हान आहे. मुंबई आणि पुण्याहून येणाऱ्या खासगी आणि परिवहन विभागाच्या बसमध्ये हे प्रकार होत आहे. दोन दिवसापूर्वी मुंबईला जाणाऱ्या दीपक चंद्रमोहन कामतीकर (५०, रा. मुलुंड, मुंबई) या प्रवाशाने बॅग बसमध्ये ठेवून ते भावाला बोलण्यासाठी खाली उतरले, तितक्यात चाेरट्यांनी संधी साधून बॅगमधील ६.९० लाख रुपये लंपास केले. शहानूरमियाँ दर्गा येथील थांब्यावर हा प्रकार घडला.
सीसीटीव्ही लावण्याचे आदेश
बसमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवावेत,असे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. मात्र अनेकांनी या आदेशाकडे कानाडोळा केला आहे. अनेकदा पुण्याहून किंवा मुंबईहून येताना हा प्रकार घडतो. मात्र बसस्थानकाजवळ उतरले असता हा प्रकार उघडकीस आला म्हणून तो शहरात नोंदवल्या जातो.