आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोडीत निघाले टुरिस्ट सर्किट;कनेक्टिव्हिटी आणि सुविधांचा अभाव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुठल्याही पर्यटनस्थळाचे एखादे सर्किट असेल तर त्या ठिकाणी एकापाठोपाठ एक अशा कनेक्टिव्हिटी आणि सोई-सुविधा उपलब्ध होतात. ‘टुरिस्ट सर्किट’ हा उद्देशच असतो. पर्यटकांना पर्यटनस्थळाची योग्य माहिती मिळावी, त्या ठिकाणी जाण्यासाठी योग्य कनेक्टिव्हिटी असावी आणि योग्य व माफक अशा सोई-सुविधा मिळाव्यात या हेतूनेच जगभरात अशा ‘टुरिस्ट सर्किट’ची निर्मिती केली जाते.
फार पूर्वी औरंगाबाद पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण सर्किट बनले होते; पण कनेक्टिव्हिटीअभावी ते मोडीत निघाले. दिल्ली-जयपूर-उदयपूर-औरंगाबाद-मुंबई या नावाने प्रसिद्ध असणा-या या वर्तुळाला ‘गोल्डन सर्किट’ म्हटले जायचे. इंडियन एअरलाइन्सच्या विमान सेवेमुळे त्याची कनेक्टिव्हिटीही खूप चांगली होती; परंतु नंतर ही विमान सेवा बंद पडली परिणामी हे ‘गोल्डन सर्किट’ही उधळले गेले. विशेष म्हणजे हे सर्किट पुन्हा जोडण्याबाबत कुणीही परिश्रम घेतले नाहीत की त्याकडे लक्षही दिले नाही. शहराला बस, रेल्वे आणि विमान सेवा अशा तिन्ही सेवांची कुठल्याही दृष्टीने योग्य कनेक्टिव्हिटी नाही. त्यामुळे पर्यटन उद्योगावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
पर्यटन परिषदेतही निर्णय नाही - अलीकडेच पश्चिमेतील राज्यांची (राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गोवा) खास पर्यटन परिषद झाली. या परिषदेतही औरंगाबादचा हा विषय उपस्थित झाला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही की त्याबाबत पुन्हा चर्चाही झाली नाही. विशेष म्हणजे अन्य राज्यांची पर्यटन कार्यालये महाराष्ट्रात आहेत; पण महाराष्ट्राच्या पर्यटन विकास महामंडळाची कार्यालये गोवा आणि गुजरात वगळता इतर राज्यांत नाहीत.
अशी होऊ शकते उपाययोजना - एमटीडीसीने आपल्या तीन वरिष्ठ अधिका-यांची सुकाणू समिती (कोअर कमिटी) तयार करून या दिशेने प्रयत्न करायला हवेत. कर्नाटक पर्यटन विकास महामंडळ (केटीडीसी), मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळ (एमपीटीडीसी), छत्तीसगढ पर्यटन विकास महामंडळ (सीएचटीडीसी), आंध्र प्रदेश पर्यटन विकास महामंडळ (एपीटीडीसी) आणि गुजरात पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) या राज्यांतील पर्यटन महामंडळांशी समन्वय साधून प्रत्येक राज्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यालय स्थापन करण्याबाबत अधिका-यांची ही सुकाणू समिती काम करेल. त्याचप्रमाणे अन्य राज्यांतून येणा-या पर्यटकांना सोई-सुविधांची कनेक्टिव्हिटी उपलब्ध करण्यासाठीही गांभीर्याने प्रयत्न व्हायला हवेत. अलीकडेच पश्चिमेतील राज्यांच्या परिषदेत याच दिशेने काही प्रयत्न झाले; परंतु प्रत्यक्षात त्याच्या अंमलबजावणीबाबत हालचाली झाल्या नाहीत.
कंपन्यांनीही पुढाकार घ्यावा - सध्या पर्यटक गुजरातमधील सापुतारा, मध्य प्रदेशातील पचमढी आणि कर्नाटकातील अईहोलेपर्यंत येत आहेत; मात्र औरंगाबादकडे फिरकतही नाहीत. जर हे पर्यटक शहरापर्यंत आले तर आपल्या शहरात रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होतील. एमटीडीसी आपल्या परीने भरपूर प्रयत्न करत आहे, सोबतच खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनीही यासाठी आवर्जून प्रयत्न व पुढाकार घ्यायला हवा. - चंद्रशेखर जैस्वाल,विभागीय व्यवस्थापक, एमटीडीसी
लवकरच सकारात्मक निर्णय - अलीकडे औरंगाबादचे सर्किट मोडीत निघाल्याचे आम्हालाही मान्य आहे. म्हणूनच त्यादृष्टीने आमचेही प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच एमटीडीसीने नव्या सर्किटसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे, कारण अन्य राज्यांकडून योग्य प्रतिसाद व समन्वय राहण्यासाठी केंद्र सरकारची मदत आवश्यक आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय झालेले दिसतील. - जगदीश पाटील, व्यवस्थापकीय संचालक, एमटीडीसी