आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा, म्हैसमाळ, दौलताबाद, देवळाई नटणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबाद जिल्ह्यात निसर्ग पर्यटनवृद्धीला मोठी संधी आहे. त्यामुळे निसर्ग पर्यटनवाढीसाठी देवराई, सातारा, म्हैसमाळ, दौलताबाद, सारोळा आणि किल्लेअंतूर या गावांचा व तेथील डोंगरांचा निसर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून वन विभागाकडून त्यासाठी निधीदेखील खर्च केला जात आहे. या वर्षी आणखी पायाभूत सुविधा देऊन पर्यटन वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली. सहायक वनरक्षक आर.आर.मळेकर यांनी सांगितले की, औरंगाबाद जिल्ह्यात वन क्षेत्रफळ 870.38 चौरस कि.मी. इतके आहे. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी निसर्ग पर्यटनासाठी चांगली संधी आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून निसर्ग पर्यटन वाढवण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये म्हैसमाळ, देवळाई, सातारा, सारोळा आणि किल्लेअंतूर या गावांचा निसर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्यात येत आहे. यामध्ये 2010 -11 मध्ये म्हैसमाळसाठी 25 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर 2011- 12 मध्येदेखील 25 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये व्ह्यू पॉइंट तयार करणे, लहान मुलांसाठी खेळणी, सोलर पथदिवे, शोभेची झाडे आणि सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच जलसंधारणाची कामे आणि बंधारे बांधण्याची कामेदेखील या निधीतून केली जातात. देवळाई या भागासाठी 2010-11 मध्ये 13.55 लाख रुपये खर्च करण्यात आले, तर 2011-12 मध्ये 54.96 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. किल्लेअंतूरमध्ये 2011- 12 मध्ये 27 लाख 12 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.

या क्षेत्राचा विकास करण्यासाठी दरवर्षी आर्थिक मंजुरी घ्यावी लागते. या वर्षीही या गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच सिमेंट नाले, बंधारे, मृद जलसंधारणाची कामे करण्यास वन विभागाचे प्राधान्य असल्याची माहितीही मळेकर यांनी दिली आहे. या परिसरातील निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करणार असल्यामुळे पर्यटनवाढीसाठी त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे हा परिसर आणखी निसर्गरम्य करण्यासाठी वन विभाग पुढाकार घेत असल्याची माहिती मळेकर यांनी दिली.