आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी कारवाई : दोन हवाला एजंटांकडून औरंगाबादमध्ये ५८.४० लाख रुपये जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - "हवाला'मार्फत जालन्याहून मुंबईकडे नेली जाणारी ५८ लाख ४० हजार रुपयांची रोकड शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पोलिसांच्या विशेष पथकाने पकडली. याप्रकरणी दोघा एजंटांना अटक करण्यात आली असून त्यांनी ही रोकड जालन्यातील काही व्यापाऱ्यांकडून आणली होती, असे पोलिसांनी सांगितले.
राजेश जयंतीलाल ठक्कर (४२, रा. हनुमान मढी, तिरुपतीनगर, राजकोट) आणि निमेश किरीटभाई ठक्कर (२५, रा. पुजारा प्लॉट, भक्तीनगर, सद््गुरू अपार्टमेंट, राजकोट) अशी अटकेतील एजंटांची नावे आहेत, अशी माहिती उपायुक्त अरविंद चावरिया यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
चावरिया यांनी सांगितले की, राजेश ठक्कर हा आठ दिवसांपूर्वी शहरात आला असून कंचनभाई नावाच्या एका व्यक्तीकडे कामाला असल्याचे तो सांगत आहे. कंचनभाईंच्या सांगण्यावरून शनिवारी दुपारी तो जालन्याला गेला होता. तेथील काही व्यापाऱ्यांकडून त्याने ५८.४० लाख रुपये जमा करून ही रोकड एका सॅकमध्ये भरून तो एसटीने रात्री औरंगाबादेत आला.
सिडको बसस्थानकावर त्याला घेण्यासाठी निमेश ठक्कर दुचाकीने (एमएच-२०-सीव्ही-३३०६)
पोहोचला. हे दोघेही दुचाकीवरून जात असताना उपायुक्तांच्या विशेष पथकातील सहायक पोलिस निरीक्षक मुकुंद पालवे, जमादार वीरबहादूर थापा, इसाक पठाण, शोण पवार, शेरा पठाण, विनोद जाधव, राजेंद्र घुणावत आणि परशुराम सोनुने यांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडून रोकडसह दुचाकी हस्तगत करण्यात आली. पोलिसांनी न्यायालयाकडे या दोघांच्या पोलिस कोठडीची मागणी केली आहे.

असा चालतो व्यवहार : राजेश ठक्कर हा शहरातील कंचनभाईकडे कामाला आहे. त्याने सांगितल्यावरून ठक्करने जालन्यातील मोहनजी नावाच्या व्यक्तीकडून ही रक्कम घेतली होती. ही रक्कम घेऊन तो औरंगाबादला पोहोचल्यानंतर पुन्हा कंचनभाईकडे जाणार होता. त्याने सांगितल्यानंतर हे दोघेही रकमेसह रेल्वेने मुंबईला जाऊन रक्कम एका व्यक्तीला पोहोचती करणार होते. मात्र, कंचनभाई आणि मोहनजी यांची पूर्ण नावे अथवा पत्ता ठक्करने पोलिसांना सांगितला नाही.

जालना सोने का पालना

जालन्यात३० पेक्षा अधिक पोलादाचे कारखाने आहेत. दहापेक्षा अधिक बी-बियाणे कंपन्या आहेत. मोठी बाजारपेठ म्हणून देशभरात ओळख आहे. या शहरातून संपूर्ण देशात व्याजाने पैसे पुरवले जातात असे बोलले जाते. हा व्यवहार नेहमी चालतो म्हणून "जालना सोने का पालना' असे या शहराला संबोधले जाते. ही रक्कम अशाच कुठल्या तरी व्यवहारातील असावी, अशी चर्चा आहे.

नोटा सरकार जमा होणार

जप्तनोटा खऱ्या की बनावट याची सोमवारी बँक अधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्या प्रथम आयकर विभाग आणि नंतर कोशागार कार्यालयात जमा केल्या जातील, अशी माहिती चावरिया यांनी दिली. दोघांविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रकमेबाबत मालकी हक्काचे पुरावे सादर केल्यानंतरच ही रक्कम न्यायालयाच्या आदेशाने परत केली जाऊ शकते.

हवालाची रक्कम म्हणजे काय?
शासनाच्या अपरोक्ष जो व्यवहार केला जातो आणि त्यासाठी ज्या रकमेची अफरातफर होते त्या रकमेला हवालाची रक्कम म्हणतात. नियमाप्रमाणे दहा हजारांवरील व्यवहार हा धनादेशाद्वारेच व्हायला हवा. मात्र, कर बुडवण्यासाठी अशा प्रकारे पैशांची देवाण-घेवाण केली जाते. ही रक्कम वाहून नेणाऱ्या लोकांना टक्केवारीप्रमाणे पैसे मिळतात. साधारणत: या पैशांची ने- आण सार्वजनिक वाहतुकीने केली जाते.

रोकड अशी
१०० रुपयांच्या आठ हजार चारशे नोटा
५००रुपयांच्या आठ हजार ६४० नोटा
१००० रुपयांच्या ६८० नोटा
हवाला एजंटांकडून जप्त करण्यात आलेल्या रकमेसह पोलिस उपायुक्त अरविंद चावरिया. छाया : दिव्य मराठी