आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेनेची दुहेरी खेळी, न.प.च्या युतीसाठी भाजपला आमंत्रण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अडीच दशकांपासून युतीत मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलेल्या शिवसेनेला राज्यात आता लहान भावाच्या तंबूत बसावे लागले. तरीही औरंगाबादचा विचार करता येथे ते अजूनही मोठ्या भावाच्याच भूमिकेत आहेत. अलीकडे राजकारण करताना त्यांच्या मनात काय चालले हे भाजपला समजेनासे झाले आहे. इकडे शहरात करारानुसार सेनेचा महापौर राजीनामा देत नाही, दुसरीकडे सेनेकडून जिल्ह्यातील पाच नगर परिषदांमध्ये युती करण्यासाठी आपणहून चर्चेसाठी भाजपला निमंत्रण देण्यात आले.
एकीकडे युती धर्म पाळायचा नाही, असे वर्तन दिसत असताना दोन्हीही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार युती करण्याची घाई सेना दाखवत असल्यामुळे आपण करावे तर काय, असा प्रश्न भाजपच्या स्थानिक नेत्यांना पडला आहे. महापौरपदाच्या राजीनामा देताना सेनेला खरेच काही अडचणी आहेत की ते मुद्दाम करताहेत, असे कोडेही भाजपला पडले आहे. १८ डिसेंबरला जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड आणि खुलताबाद या पाच नगर परिषदांसाठी मतदान होणार आहे. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रारंभी युती करता लढण्याचे भाजपने ठरवले होते; परंतु मराठवाड्यात या निवडणुकांत भाजप तिसऱ्या स्थानावर असेल, असा पोलिसांचा अहवाल गेल्यानंतर भाजप काहीसा गंभीर झाला. युती केल्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसल्याने त्यांनी तसा निर्णय घेतला.

इकडे शिवसेनेला नगर परिषदांच्या निवडणुकीत युतीची फारशी गरज नव्हती. तरीही वरून आदेश आल्याने त्यांनी गेल्या आठ दिवसांपूर्वी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा केली; परंतु तेव्हा सर्वांनाच औरंगाबादच्या महापौरांचा राजीनामा कधी, असा प्रश्न पडलेला होता. त्यावरच्या चर्चेतच ही बैठक संपली. जोपर्यंत महापौरांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत आता पुढील चर्चा नाही, असे काहीसे चित्र होते. त्यामुळे भाजपनेही नगर परिषद निवडणुकीचा विषय पुढे काढला नाही; परंतु मध्येच गुरुवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड तसेच जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्याशी संपर्क साधून युतीच्या निर्णयासाठी कधी बोलणी करायची अशी विचारणा केली.

गुरुवारी जिल्हाध्यक्ष जाधव हे जिल्ह्याबाहेर होते. त्यामुळे ही बोलणी पुढे ढकलण्यात आली. आता ही बोलणी रविवारी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शहरात युती पाळली जात नसताना सेनेकडून आपणहून युतीच्या बोलणीसाठी विचारणा झाल्यानंतर भाजपचे स्थानिक नेतेही चक्रावले आहेत.

महापौरांच्या राजीनाम्यावर निर्णय घेतल्यामुळे त्यांना युती पाळायची नाही, असे दिसते. मात्र, दुसरीकडे तेच फोन करून नगर परिषदेच्या युतीबाबत स्वत:हून विचारणा करतात. त्यामुळे सेनेच्या मनात नेमके काय, असा प्रश्न भाजपला पडला आहे.

रविवारच्या चर्चेवर बरेच काही अवलंबून
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही युती धर्माचे पालन करणारे आहोत, महापौरांच्या राजीनाम्याच्या विषय आमच्या अखत्यारीत येत नाही, असे दाखवण्याचा सेनेचा प्रयत्न असल्याचे समजते. इकडे महापौरांचा राजीनामा घ्यायचा नाही आणि शिवसेनेच्या लेखी जास्त महत्त्व नसलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या चर्चेसाठी पुढे यायचे, अशी ही खेळी असल्याचे समजते. अर्थात, रविवारी सेनेकडून गंभीरपणे चर्चा होते की फक्त करायची म्हणून चर्चा केली जाते, यावरून बरेच काही स्पष्ट होईल.
बातम्या आणखी आहेत...