आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न. प. युतीसाठी पुढील आठवड्यात बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नगरपरिषदांच्या निवडणुकीत शिवसेना भाजपनेही स्थानिक नेते-पदाधिकाऱ्यांना स्वतंत्र लढण्याचे आदेश-निर्देश दिले होते. परंतु गुरुवारी अचानक झालेल्या बैठकीत युती करण्याचा निर्णय झाला. स्थानिक नेत्यांनी स्वतंत्र लढण्याची तयारी चालवली होती. परंतु मध्येच युतीची सूचना आल्याने आता स्थानिक पातळीवर बैठकांचे सत्र सुरू होणार आहे. दिवाळी झाल्यानंतर पुढील आठवड्यात शिवसेना भाजपचे स्थानिक नेते युतीसाठी एकत्र येणार आहेत.
वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, कन्नड पैठण या पाच नगर परिषदांपैकी पाच वर्षांपूर्वी वैजापूर नगर परिषदेत सेना-भाजपची युती झाली नव्हती. अन्य चारही नगर परिषदांमध्ये ते एकत्र लढले होते. या नगर परिषदांचा विचार करता तेथे भाजपचे फारसे प्राबल्य नाही. त्यामुळे भाजपला दुय्यम असेच स्थान होते. युती झाली तर या वेळीही दुय्यम स्थान राहील, म्हणून भाजपने स्वतंत्र लढण्याचा मनसुबा जाहीर केला होता. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला माघार घ्यावी लागली. त्यामुळे आता जेव्हा युतीच्या बैठका होतील, तेव्हा अर्थातच शिवसेनेचीच दादागिरी चालणार हे स्पष्ट आहे.

पोलिसांच्या अहवालामुळे माघार? मराठवाड्यातीलनगर परिषदांमध्ये भारतीय जनता पक्ष चौथ्या क्रमांकावर जाईल, असा अहवाल पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेने दिला होता. त्यामुळे भाजपने युती करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. अर्थात गोवा विधानसभा तसेच मुंबई मनपा निवडणुकीचीही याला किनार आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार युतीच्या निर्णयाला पोलिसांचा अहवाल कारणीभूत आहे. भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहणार असाही जर हा अहवाल असता तर भाजपने स्वतंत्र लढण्याचे ठरवले असते. पोलिसांचे अहवाल शतप्रतिशत खरे ठरत नसले तरी त्यात तथ्यांश असतो. त्यामुळे भाजपने मवाळ भूमिका घेतल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

खुलताबाद वगळता भाजपला नगराध्यक्षपद मिळणार नाही?
नगराध्यक्षपदाचे वाटप होण्यास जेव्हा या दोन मित्र पक्षांचे पदाधिकारी बसतील तेव्हा खुलताबाद वगळता अन्य चारही नगर परिषदांचे नगराध्यक्षपद शिवसेना मागेल हे नक्की आहे. त्यामुळे भाजप पाचपैकी फक्त एकच नगराध्यक्षपदावर समाधान मानेल का हा प्रश्न आहे. सेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाचही नगर परिषदांच्या शहरामध्ये भाजपचा फारसा जोर नाही. तेथील नगराध्यक्षपद भाजपकडे कसे द्यायचे, असाही प्रश्न आतापासूनच उपस्थित झाला आहे. दुसरीकडे भाजप किमान दोन नगराध्यक्षपद मागेल. ही मागणी शिवसेनेकडून कितपत मान्य होईल, ही शंका आहे. राहिला नगरसेवकपदाचा प्रश्न तर त्याचा निर्णय नगर परिषद पातळीवर घेतला जाईल. एकूणच आगामी काळात आता युतीच्या बैठकांचा सिलसिला सुरू होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...