आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅक्टरच्या धडकेने चिमुकलीचा अंत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मुलाला शाळेत सोडून घरी परतणार्‍या महिलेच्या स्कूटीला मंगळवारी (29 जानेवारी) सकाळी पावणेदहा वाजता ऑडिटर सोसायटीच्या रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टरने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून खाली पडल्याने पावणेदोन वर्षांच्या चिमुकलीचा करुण अंत झाला.

नारायण फुके हसरूल परिसरातील अशोकनगर भागात राहतात. त्यांची पत्नी रेखा पावणेदोन वर्षांच्या प्रगतीला घेऊन स्कूटीवर (एमएच 20 सीएम 7907) मुलाला गुडवर्ड इंग्रजी शाळेत सोडण्यासाठी गेल्या. त्यानंतर त्या ऑडिटर सोसायटीमधील रस्त्यावरून जात होत्या. त्याच वेळी समोरून भरधाव ट्रॅक्टर (एमएच 28 डी 5405) आले. त्या ट्रॅक्टरने स्कूटीला जोराची धडक दिली. त्यामुळे रेखा व त्यांची मुलगी प्रगती रस्त्यावर पडले. यात प्रगतीचा जागीच अंत झाला. अपघातानंतर प्रगतीला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. रेखा यांनाही जबर मार लागला आहे. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिडको पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केले असून चालक मात्र फरार आहे.

नियमांचे उल्लंघन
सध्या भीषण पाणीटंचाई असल्याने मयूर पार्क, ऑडिटर सोसायटी, मोहिनीराजपुरम, भगतसिंगनगर या वसाहतींमध्ये पाण्याच्या टँकरची ये-जा मोठय़ा प्रमाणात वाढलेली आहे. अरुंद रस्त्यावर प्रचंड वर्दळ वाढली असल्याने ट्रॅक्टर, बस तसेच इतर वाहनांची गती कमी असणे गरजेचे असते; परंतु बहुतांश वाहने वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत भरधाव वेगाने जातात.