आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानाचे शटर वर करताच दिसला मालकाचा मृतदेह, सावकाराला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एन-१सिडको एपीआय कॉर्नर येथील व्यावसायिक राजेश अंगद पाटील (४४) यांच्याकडे काम करणारे माणिक शहा यांनी बुधवारी सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे शटर उघडले आणि ज्याच्या जिवावर आपला संसार चालतो तो मालकच फासावर लटकलेला पाहून त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. स्वत:ला सावरत घटनेेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहा यांनी पोलिसांना फोन केला. तत्काळ दाखल झालेल्या पोलिसांनी पाटील यांना घाटी रुग्णालयात हलवले. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. पाटील यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीच्या आधारावर तपासाची चक्रे फिरली. सावकारांच्या जाचाला कंटाळून पाटील यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. त्या सावकारांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
भारत बाजाराच्या इमारतीसमोर पाटील यांचे मातोश्री व्हील केअर सेंटर आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान ते दुकान बंद करून एक किल्ली शहा यांच्या हाती देऊन घरी गेले. पत्नीशी, मुलांशी गप्पा मारल्या. जेवण झाल्यावर आत्ता येतो, असे म्हणून ते घराबाहेर पडले. रात्री ११.३० ते १२ च्या दरम्यान दुकानात मागच्या दरवाजातून शिरले. दुकानाच्या पत्र्याला आधार म्हणून असलेल्या लोखंडी पाइपला नायलॉनची दोरी बांधून आत्महत्या केली.
सावकारांच्याजाचाला कंटाळलो : मृत्यूलाकवटाळण्यापूर्वी पाटील यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी व्यवसायासाठी सावकारांकडून कर्ज घेतले होते. व्यवसाय बऱ्यापैकी चालत असल्याने ते दरमहा दहा हजार रुपयांप्रमाणे फेडले. तरीही सेक्युरिटी म्हणून दिलेले चेक सावकार परत देत नव्हते. उलट अजून पैशाची मागणी करत होते. त्यांच्या जाचाला कंटाळून मी जीवन संपवत आहे.
सावकारी करणारी टोळी
शहरातसावकारी आणि भिशीचा गोरखधंदा करणारी टोळी आहे. गरजवंतांना गाठून त्यांच्या अव्वाच्या सव्वा व्याजदराने पैसे देणे, त्यापोटी त्यांच्याकडून कोरे चेक घेणे आणि पैसे देणे झाल्यास चेक टाकण्याची धमकी देणे, असे प्रकार सर्रास सुरू आहेत. या सावआरांनी वसुलीच्या धंद्याला कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठी या पतसंस्था उघडल्या आहेत.
पाटील यांची चिठ्ठी पोलिसांनी त्यांच्या पत्नीला दाखवली. ज्यांची नावे या चिठ्ठीत आहे त्यांच्यावर भादंवि कलम ३०६ अन्वये मृत्यूस कारणीभूत असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पळून जाऊ नयेत म्हणून त्यांची नावे जाहीर करण्यास पोलिसांनी नकार दिला. कर्ज फेडण्यासाठी पाटील यांनी सिडकोतील एक प्लॉट विकला, शिवाय एक व्यवसायही बंद केला. पुंडलिकनगर येथील राहत्या घरावरही कर्ज घेतले होते, अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांनी पोलिसांनादिली.