आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन तरुणांच्या बळीनंतरही चोरटी वाळू वाहतूक सुरूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांचा परिसरात सुळसुळाट झाला आहे. विनाक्रमांक तसेच क्रमांकामध्ये खाडाखोड केलेल्या वाहनांवर ताडपत्री टाकून वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे. अशाच वाळूमाफियांमुळे गुरुवारी सकाळी वाळूज येथील दोन तरुणांना प्राण गमवावे लागले. यानंतर तरी वाळू तस्करांवर कारवाई केली जाईल, अशी सामान्यांची अपेक्षा होती. परंतु शुक्रवारीही विनाक्रमांकाच्या हायवा ट्रकमधून चोरटी वाळू वाहतूक सुरूच होती.
महसूल विभाग, पोलिस प्रशासन प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे वाळूज परिसरातील वाळूमाफियांचे पेव फुटले आहे. परिणामी महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे. त्याचाच प्रत्यय गुरुवारी अपघातात ठार झालेल्या दोन युवकांच्या कुटुंबीयांना आला. परिसरातील शेंदूरवादा, शिवपूर, टेंभापुरी तसेच नगर जिल्ह्यातील काही भागांमधून दररोज वाळूची चोरटी वाहतूक सुरू असते. नगरमार्गे औरंगाबादच्या दिशेने येताना टोलनाक्यावरील पोलिसांच्या डोळ्यादेखत वाळूचे ट्रक निघून जातात. वाळूज पोलिस ठाण्याच्या मुख्य गेटसमोरून हे ट्रक कामगार चौकमार्गे पंढरपुरातील तिरंगा चौकात पोहोचतात. या दोन्ही ठिकाणांप्रमाणेच तिरंगा चौकातही वाहतूक पोलिस या ट्रककडे दुर्लक्ष करतात. जुनाट अथवा विनाक्रमांकाच्या ट्रकमधून बजाजनगरातील मोहटादेवी मंदिर परिसरात वाळूची विक्री केली जाते. या मार्गावर रेंगाळणाऱ्या ट्रकमुळे दररोज वाहतूक कोंडी अपघात होत आहेत.

एकावर गुन्हा दाखल
१२ दिवसांत १३ वाहने ताब्यात घेऊन त्यातील एका वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कारवाई तीव्र करण्यासाठी इतर विभागांची मदत घेतली जाणार आहे. चंद्रकांत शेळके, तहसीलदार,गंगापूर

कारवाईचे सत्र सुरू
^मोहटादेवी मंदिर परिसरात वाळू विक्री करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते, परंतु त्यांच्या वाहनांवर क्रमांक नसतात. अशा वाहनांवर कारवाई करण्याचे काम आरटीओ पोलिसांचे आहे. रमेश मुनलोड, तहसीलदार,औरंगाबादॉ

तीन महिन्यांत १२ जणांवर काळाची झडप
वाळूजऔद्योगिक परिसरातील अपघातांचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून आॅक्टोबर २०१५ ते २९ जानेवारी २०१६ दरम्यान १२ निष्पाप नागरिकांचा अपघाती बळी गेला आहे. त्यात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात पुन्हा दोन जणांचा जीव गेला आहे. आॅक्टोबर २०१५ रोजी गरवारे कंपनीलगत रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धेचा वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. त्यानंतर २१ नोव्हेंबर ,४ डिसेंबर, १२ डिसेंबर, २९ डिसेंबर, २७, २८ २९ जानेवारी रोजी झालेल्या अपघातात तब्बल १२ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे यात ३० वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या सात तरुणांचा समावेश आहे.
विनाक्रमांकाच्या हायवा ट्रकमधून वाळूजमार्गे वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे. शुक्रवारी दुपारी ३.१३ वाजता टिपलेले हे दृश्य.