आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅफिक गार्डनचे काम रखडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाहतूक नियमांबाबत लहान वयातच माहिती व्हावी. लहानांबरोबर येणाऱ्या मोठ्यांनाही त्याची जाणीव व्हावी आणि यातूनच शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी या उद्देशाने सिद्धार्थ उद्यानात वाहतूक उद्यान (ट्रॅफिक गार्डन) उभारले जात आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २५ लाखांचा निधीही उपलब्ध करून दिला, तरीही कंगाल मनपाकडून या कामाला गती मिळाली नाही. येत्या २६ जानेवारीपर्यंत हे काम पूर्म होणे अपेक्षित होते; पण फक्त १५ ते २० टक्के काम झाले आहे. तेही निकृष्ट असल्याची शंका व्यक्त होत आहे. त्यामुळे हा चांगला उद्देश कितपत सफल होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मध्यवर्ती बसस्थानकाशेजारी असलेल्या सिद्धार्थ उद्यानामध्ये दीड एकर जागेवर ट्रॅफिक गार्डन उभारण्याचे काम सुरू आहे. सिद्धार्थ उद्यानात पूर्वी असलेल्या ट्रॅफिक गार्डनच्या जागेवरच हे काम नव्यान हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे नवीन डिझाइनवर जास्त काम करण्याची गरज पडली नाही. प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारीपर्यंत उद्यान नागरिकांसाठी खुले करण्याचे मनपाने ठरवले होते.

नागपुरात जाऊन पाहणी
नागपूरच्या धर्तीवर शहरात वाहतूक उद्यान उभारण्यात येत आहे. यासाठी वाहतूक पोलिसांच्या दोनसदस्यीय टीमने नागपुरात जाऊन तेथील उद्यानाचा अभ्यास केला. या आधारे ट्रॅफिक गार्डनचे डिझाइन करण्यात आले. पण कंत्राटदार त्यांच्या सोईनुसार अधूनमधून काम करत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे निर्धारित वेळेत काम पूर्ण होणे अशक्य असल्याचे दिसते.

उद्यानाचा पायाच कच्चा
या संपूर्ण कामाची पाहणी "डीबी स्टार' चमूने केली. तेव्हा सिद्धार्थ उद्यानात जुन्याच जागेवर काम सुरू असून येथे नव्याने रस्ते तयार करण्यात येत आहेत. मात्र, उद्यानाचे काम योग्य दर्जाचे होत नसल्याचे आढळले. रस्त्यांसाठी पाया न खोदता केवळ मातीचा चार-सहा इंचांचा थर बाजूला करून त्यावरच पिंचिंग केली जात आहे. त्यामुळे हे रस्ते अल्पावधीच उखडण्याची शक्यता आहे. परिणामी या उद्यानाची अवस्थाही आधीच्या दोन उद्यानाप्रमाणेच होण्याची शक्यता आहे.

सिग्नल, ४५ फलक
उद्यानामध्ये वाहतूक सिग्नलसह विविध प्रकारची माहिती देणारे ४५ प्रकारचे फलक लावण्यात येणार आहेत. झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाइन, अरुंद रस्ते, वळणे, वेग मर्यादा, प्रवेश निषेध, वन वे तसेच शाळा, कॉलेज, रुग्णालये, पेट्रोल पंप आदींची माहिती देणारे फलक लावण्यात येणार आहेत.

पूर्वीचे गार्डन झाले बकाल
यापूर्वी मनपाने सिद्धार्थ उद्यानासह हडको एम-२ मध्ये ट्रॅफिक गार्डन उभारले होते. मात्र, हलगर्जीपणामुळे दोन्ही गार्डन बकाल झाले असून त्याचे नामोनिशाण मिटले आहे. विशेष म्हणजे अनेकांना येथे ट्रॅफिक गार्डन असल्याची कल्पनाही नाही. त्यामुळे यामागचा उद्देश तर पूर्ण झालाच नाही, उलट उद्यानावरील खर्चही वाया गेला.

अधिकारी नॉट रिचेबल
उद्यानाच्या निकृष्ट कामाबाबत अभियंता निंबाळकर यांनी ट्रॅफिक गार्डनचे काम वॉर्ड अ चे अभियंता बी. के. परदेशी यांच्याकडे असल्याचे सांगितले. मात्र, परदेशी यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.

लवकरच काम होईल
सिद्धार्थ उद्यानातील या ट्रॅफिक गार्डनचे २५ टक्के काम झाले आहे. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापर्यंत काम पूर्ण करून उद्यान खुले करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे. त्यामुळे हे काम लवकरच पूर्ण होईल, असे वाटते.
- विजय पाटील, उद्यान अधीक्षक, मनपा