आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 वर्षांपासून होतेय वाहतुकीची कोंडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जवाहर कॉलनी परिसरात 15 वर्षांपूर्वी भाजी मंडई उभारण्यात आली, पण ती अद्यापही सुरूच झालेली नाही. यासाठी ना नगरसेवकांनी पुढाकार घेतला ना व्यापा-यांनी. परिणामी भाजी विक्रेत्यांनी भर रस्त्यावरच पथारी पसरली. आधीच रुग्णालये, दुकाने, कॉम्प्लेक्सची गर्दी. त्यात लहान रस्त्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. दुसरीकडे भाजी मंडईच्या जागेत नको त्या धंद्यांना ऊत आला आहे. घाण, कचरा आणि बकालीने मंडईचा परिसर व्यापला आहे.

जवाहर कॉलनी परिसरातील भानुदासनगर वॉर्डातून एकदा राधाबाई तळेकर या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी त्रिमूर्ती चौकातील महापालिकेच्या खुल्या जागेवर सावित्रीबाई फुले भाजी मंडई उभारण्याचा प्रस्ताव 1999 मध्ये सर्वसाधारण सभेपुढे ठेवला होता. त्याला मंजुरीही मिळाली होती. वर्षभर काम चालले. सुमारे 10 लाख रुपये ही भाजी मंडई उभारण्यासाठी खर्च करण्यात आले. गरीब भाजी विक्रेत्यांना योग्य भावात जागा आणि नागरिकांना एकाच ठिकाणी जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, हा उद्देश यामागे होता. भाजी मंडईचे बांधकाम झाले, परंतु सुरू होण्याआधीच माशी शिंकली. गेल्या 15 वर्षांपासून ही मंडई सुरू न होता तशीच पडून आहे. त्यामुळे तिचे खंडहर झाले आहे. याबाबत मनपाचे मालमत्ता अधिकारी एस. पी. खन्ना यांना विचारले असता, हा विषय जुना असून माहिती घेऊन सांगतो, असे ते म्हणाले.

वाहतुकीला अडथळा
भाजी मंडईत एकूण 30 दुकाने तयार करण्यात आली. शिवाय अधिक जागा रिकामी असल्याने इतरही गाड्या येथे लागू शकतात. भाजीपाला विक्रेत्यांसह फळांच्या दुकानांचाही येथे समावेश होऊ शकत होता. मात्र, मंडई सुरूच न झाल्याने असंख्य भाजी विक्रेते आणि हातगाडीवाल्यांनी त्रिमूर्ती चौक आणि परिसरात अतिक्रमण केले. रस्त्यावरच व्यवसाय सुरू झाल्याने अतिक्रमण वाढले आणि वाहतुकीला अडथळा येऊ लागला.

15 वर्षांत परिस्थिती बदलली
गेल्या 15 वर्षांत जवाहर कॉलनी परिसर हा मिनी मार्केट म्हणून उदयास आला. गजानन मंदिर ते घोडा चौकापर्यंत हेडगेवार रुग्णालय, त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स, वाइन शॉप, बिअर बार, 15 शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत. यामुळे गजानन मंदिर ते घोडा चौकापर्यंत वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली. या रस्त्यावर हातगाड्या उभ्या राहत असल्याने येथे वाहतुकीचा खोळंबा नित्याची बाब झाली आहे.

हॉर्नचा कायम त्रास
त्रिमूर्ती चौक, गजानन मंदिर, बौद्धनगर, शिवशंकर कॉलनी चौक येथे सातत्याने ट्रॅफिक जाम होते. अशा वेळी वाहनचालक मोठ्याने हॉर्न वाजवतात. परिणामी रुग्णालयातील रुग्णांना आणि नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी असंख्य तक्रारी केल्या, पण याकडे लोकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासनानेही दुर्लक्षच केले आहे.

गजानन मंदिर परिसरावरही परिणाम
सावित्रीबाई फुले भाजी मंडई सुरू होत असल्याने गजानन मंदिर परिसरातील भाजी विक्रेत्यांना दिलासा मिळाला होता. या भाजी मंडईमुळे परिसरात 29 कॉलन्यांना याचा फायदा होणार होता. मात्र, मंडईच सुरू न झाल्याने त्रिमूर्ती चौकासह गजानन मंदिर चौकावरही त्याचा परिणाम झाला आहे.

पार्किंगची समस्या
या भागातील नागरिकांनी रस्त्यावरच दुकाने आणि घरे बांधली. कुणीही येथे पार्किंगसाठी जागा सोडलेली नाही. परिणामी भाजीपाल्याच्या गाड्या आणि रस्त्यावर उभे राहणा-या वाहनांनी संर्पूर्ण रस्ते व्यापले आहेत. तसेच किरकोळ अपघातांची संख्याही वाढली आहे.

प्रस्तावाला केराची टोपली
2005 मध्ये तत्कालीन नगरसेविका आशा बिनवडे यांनी दुकानांचा लिलाव करून पुन्हा मंडई खुली करावी, असा प्रस्ताव ठेवला. मात्र, त्यांच्या या प्रस्तावाकडे कुणीच लक्ष दिले नाही. त्यानंतर आलेल्या नगरसेवकांनीही या प्रकरणाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आज लाखो रुपये खर्च करून बांधलेली मंडई भकास झाली.

काय म्हणतात नागरिक
- आज वाढती वाहतूक लक्षात घेता भाजी मंडई सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करायला हवेत. -नितीन नवगिरे
- ही मंडई सुरू झाली तर अनेक समस्या सुटतील. परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन भाजी मंडई तत्काळ सुरू करण्यासंदर्भात नगरसेवकांसोबत चर्चा करू. -नंदू लबडे