आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन्ही बाजूंनी काम अन् ट्रॅफिक जाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- क्रांती चौक-रेल्वेस्टेशन रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा नवा टप्पा सुरू झाला आहे. मागील आठवड्यापासून क्रांती चौक ते उस्मानपुरा चौकाचे काम सुरू करण्यात आले. गुरुवारपासून या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खोदकाम सुरू झाले आहे. परिणामी वाहनधारकांना उलटा फेरा मारून जावे लागत आहे. यामुळे चुन्नीलाल पेट्रोल पंपाशेजारील रस्ता आणि उस्मानपुरा चौक ते संत एकनाथ रंगमंदिरमार्गे जाणार्‍या रस्त्यावर वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.
एक वर्षापासून सुरू असलेल्या रेल्वेस्टेशन रस्त्याच्या कामाला आता वेग आला असून 5000 मीटर रस्त्यापैकी 2,340 मीटरचे काँक्रिटीकरण झाले आहे. गेल्या आठवड्यापासून क्रांती चौक ते उस्मानपुरा चौक या टप्प्याच्या कामाला प्रारंभ झाला. आजपासून या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना एकाच वेळी खोदकाम सुरू करण्यात आले. त्यामुळे पहिल्याच दिवशी या भागात वाहतुकीची कशी तारांबळ उडाली याची पाहणी ‘दिव्य मराठी’ने केली. त्यात चुन्नीलाल पेट्रोल पंपाशेजारील रस्ता व उस्मानपुरा चौक ते उत्सव मंगल कार्यालय या दोन्ही रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली.
बोर्डासमोर वाहनेच वाहने
एसएससी बोर्ड ते चुन्नीलाल पेट्रोल पंप हा रस्ता आता दुथडी भरून वाहतो. सायंकाळी महाविद्यालये, कार्यालये सुटली की वाहनांना एक तर या रस्त्याने जावे लागते किंवा काल्डा कॉर्नरमार्गे वाट काढावी लागते. देवगिरी महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, पॉलिटेक्निक, आयटीआय, रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहत आणि रेल्वेस्टेशन अशी चारही दिशांनी वाहने या रस्त्यावर येतात. क्रांती चौकमार्गे ही वाहने शहरात किंवा जालना रोडकडे वळतात. आता ही वाहने चुन्नीलाल पेट्रोल पंपाशेजारील रस्त्याने वळतात आणि जिल्हा बँकेसमोरून वळसा घेऊन जातात. दुसरीकडे जालना रोड अथवा पैठण गेटकडून येणार्‍या वाहनांना थेट जाता येत नसल्याने पुलाखालून चुन्नीलाल पंपाशेजारील रस्त्यावरून जावे लागते. आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास व सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. खराब रस्त्यावर वाहनांची गर्दी झाल्याने काही मीटरच्या या रस्त्यावरून जाण्यासाठी दहा मिनिटे घालवावी लागली.
दोन्ही दिशांनी वाहनांची भर पडल्याने कोंडी वाढली: क्रांती चौकातून रस्ता बंद असल्याने अमरप्रीत हॉटेल ते काल्डा कॉर्नर ते उत्सव मंगल कार्यालय, रंगमंदिरमार्गे उस्मानपुरा चौक या रस्त्याने वाहनांची ये-जा सुरू झाली आहे. याशिवाय स्टेशनकडून येणारी आणि सिडकोकडे जाणारी वाहनेही याच मार्गाने जात आहेत. परिणामी उस्मानपुरा चौक ते उत्सव मंगल कार्यालय या रस्त्यावर दुपारपासून वाहतुकीची कोंडी झाली. हा कागदावर वनवे असला तरी त्याचा नेहमीच दुहेरी वापर होतो. दोन्ही दिशांनी येणार्‍या वाहनांची भर पडल्याने कोंडी वाढली आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास या भागात वाहने अडकून पडली होती.