आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Traffic Management Was Disturb At Wednesday In Aurangabad

हट्टी औरंगाबादकरांनी पोलिसांचे नियोजन धाब्यावर बसवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मोंढा नाका पुलाच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडच्या कामासाठी मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस मेगाब्लॅाक करण्यात आला होता. मंगळवारी पोलिसांचे वाहतूक नियोजन वाखणण्यासारखे होते. दिवसभरात कुठेही ट्रॅफिक जाम नव्हता. मात्र, बुधवारी मनाप्रमाणे वागणाऱ्या औरंगाबादकरांनी दिलेल्या रस्त्यावरून न जाता शॉर्टकटचा वापर केल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली.
पोलिस प्रशासनाने मेगाब्लॉकची कल्पना नागरिकांना दिली होती. त्यासाठी सेव्हन हिल्स, गजानन महाराज मंदिर चौक, जवाहरनगर पोलिस ठाणे, रोपळेकर हॉस्पिटल, काल्डा कॉर्नर ते दूध डेअरी चौक या रस्त्याचा वापर करण्यास प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे ४० पोलिसांचा फौजफाटादेखील तैनात करण्यात आला होता. बुधवारी मात्र ही व्यवस्था कोलमडल्याचे दिसून आले. नागरिकांनी स्वत:ला जवळ पडेल, अशा रस्त्याने येणे-जाणे पसंत केल्याने मोठी तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
सिल्लेखान्याकडून सेव्हन हिल्सकडे येण्यासाठी नागरिकांनी कैलासनगर स्मशानभूमीकडून येणारा रस्ता धरल्याने दिवसभर या रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाली होती. अनेकांना तासन् तास अडकून पडावे लागले. दुचाकी, चारचाकी समोरासमोर आल्याने वाहनांची लांबच लांब रांग लागल्याचे चित्र दिवसभर होते. कैलासनगरमधील हा रस्ता अत्यंत अरुंद आणि खराब असल्याने पायी जाणाऱ्यांचेही हाल झाले.
वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम पोलिस आयुक्त अमितेशकुमार करत आहेत; पण वाहनचालकांनीही जर जबाबदारी ओळखून वाहतूक नियमांचे पालन केले तर अशी समस्या उद्भवणारच नाही. बुधवारी वाहनचालकांच्या बेशिस्तपणाचे अनेक पुरावे कैलासनगर रोडवर दिसून आले. समोरून जर चारचाकी वाहन येत असेल तर दुचाकीस्वारांनी एका बाजूला उभे राहावे, अन्यथा आपली लेन सोडता गाडी चालवावी. मात्र, अनेक दुचाकीस्वार चारचाकीसमोर येऊन गाडी उभी करत असल्याने वाहनांच्या रांगाच रांगा होत होत्या. प्रत्येकालाच पुढे जाण्याची असलेली घाई त्यांनाच त्रासदायक ठरत होती.
तरुणांनी केले वाहतूक नियोजन
कैलासनगरातील नितीन गवळी, शुभम नागकीर्ती, सुजित पंढेरे या तरुणांनी या वेळी वाहतूक नियोजन केले. दिवसभर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
पोलिसांच्या नियोजनात कमतरता
पोलिसांनी मंगळवारी केलेले वाहतूक नियोजन बुधवारी मात्र दिसले नाही. कैलासनगर रोडवर तुरळक पोलिस कर्मचारी दिसून आले. प्रचंड वाहतूक असल्याची कल्पना आल्यानंतरही पोलिस कुमक तेथे आली नव्हती.