आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायवेवर चक्का जाम: पर्यायी मार्गाने जाण्यापेक्षा अवजड वाहनांनी 10 वाजेपर्यंत रस्त्यावरच वाट पाहिली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बीड बायपासवरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने पोलिस आयुक्तांनी सकाळी सात ते रात्री दहापर्यंत या रस्त्यावर जड वाहनांना प्रवेश बंदी केली. पुढील सात दिवस प्रायोगिक तत्त्वावर ही बंदी असणार आहे. मात्र पहिल्याच दिवशी ट्रक चालकांनी वळण रस्त्याचा उपयोग करता रात्री दहा वाजेपर्यंत रस्त्याच्या बाजूला वाहने उभी करून वाट पाहणे पसंत केल्याने एंट्री आणि एक्झिट पॉइंटवर रात्री उशिरापर्यंत चक्का जाम झाला होता. यामुळे औरंगाबाद शहराकडे येणाऱ्या एसटी बसेस, कार, उद्योगांची वाहने अडकून पडली. 

वाळूज लिंक रोड, झाल्टा फाटा, सुंदरवाडी, दौलताबाद रोड, पैठण रोड या सर्व ठिकाणी हायवा ट्रक, टिप्पर, कंटेनर आदी वाहने रस्त्याच्या बाजूला उभी केली. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. वाहतूक शाखेचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते. 

टेम्पोही थांबवले...
जडवाहन प्रवेशबंदीचा फटका वाळूज परिसरातील उद्योजकांनाही बसला. औद्योगिक वसाहतीत कच्या मालाची ने-आण दिवसा टेम्पोने केली जाते. मात्र या निर्णयामुळे टेम्पो अडकले माल कारखान्यापर्यंत वेळेत पोहोचू शकला नाही. निर्णय चांगला असला तरी नियोजनाचा अभाव असल्याची प्रतिक्रिया उद्योजकांनी दिली. अनेक खासगी लहान वाहनांना बाहेर पडण्यासाठी ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागला. 
 
ट्रकचालकांनी सहकार्य करावे 
वळण मार्गाचावापर करण्याच्या सूचना देऊनही अनेक वाहनधारकांनी या मार्गाचा वापर करता रस्त्याच्या कडेला गाड्या लावून दहा वाजण्याची वाट पाहिली. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. अपघातात जाणारे जीव वाचवण्याकरिता ट्रकचालकांनी इतर वाहनधारकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. 
- सी.डी. शेवगण, सहायक पोलिस आयुक्त 

केवळ प्राइम टाइमला वाहतूक बंद ठेवा 
बीड बायपासला दिलेले पर्याय लांबचे आणि रस्तेही खराब आहेत. सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत कार्यालये, शाळा, महाविद्यालयात जाण्याची घाई असते. तसेच संध्याकाळी पाच ते दहा दुचाकींची संख्या अधिक असते या वेळी जड वाहनांचा प्रवेश बंद करावा. मधल्या वेळेत जड वाहनांना प्रवेश द्यावा, असे मत काही ट्रकचालकांनी व्यक्त केले. 
बातम्या आणखी आहेत...