आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना रोड दिवसभर 'जाम', मोंढा नाका उड्डाणपुलाखाली जलवाहिनी दुरुस्तीचे काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जालना रोडवरील मोंढा नाका उड्डाणपुलाखाली फुटलेल्या पाइपलाइन दुरुस्तीच्या कामाने सोमवारी (११ मे) किमान ६० हजार वाहनचालकांना वेठीस धरत ट्रॅफिक जाममध्ये अडकवले. दुरुस्तीच्या कामाची कोणतीही पूर्वकल्पना महापालिका, समांतरच्या ठेकेदार कंपनीने वाहतूक विभागाला दिली नाही. परिणामी ४१ अंशांच्या रणरणत्या उन्हात जालना रोडसह मोंढा नाका ते सिल्लेखाना चौक, जवाहर कॉलनी, त्रिमूर्ती चौक, सिंधी कॉलनी आदी भागात सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत अक्षरश: गोंधळाचे वातावरण होते.
कैलासनगर, शहागंजकडे जाणारी ७०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी रविवारी सकाळी फुटली. तिच्या दुरुस्तीचे काम सायंकाळी सुरू झाले. ते सोमवारीही सुरूच होते. मात्र, या कामाची नोंद घेऊन मोंढा उड्डाणपुलाखालून आकाशवाणी आणि आकाशवाणीकडून अमरप्रीतकडे जाणारी वाहने अन्य मार्गाने वळवावी, असे कोणतेही पत्र वाहतूक विभागाला महापालिका किंवा समांतरच्या ठेकेदाराकडून देण्यात आले नाही. सकाळी साडेदहाच्या सुमारास पाण्याचे लोंढे अमरप्रीत चौकाकडे वाहू लागल्यावर पोलिसांना हा प्रकार कळाला. त्यांनी तत्काळ पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेडस लावले आणि वाहतूक बंद केली. सोमवारचा दिवस असल्याने वाहनांची संख्या अधिक होती. त्यांनी रोकडिया हनुमान कॉलनीतीलगल्ल्यांमधून मोंढा नाका गाठण्याचा प्रयत्न केला. त्यात दोन मिनिडोअर अडकले. पाहता पाहता चारही गल्ल्या वाहनांनी भरून गेल्या. दरम्यान, जुन्या मोंढ्यातून तीन मालवाहू ट्रक चौकात आले. सिल्लेखान्यातूनही वाहनांची गर्दी वाढली. काही वाहनचालकांनी जाम मधून सुटका करून घेण्यासाठी वाहने मागे घेण्याचा प्रयत्न केला. तोही फसला. पाहता पाहता सिल्लेखाना चौक ते मोंढा चौक, महर्षी वाल्मिकी चौक (अभिनय चित्रपटगृह) ते रॉयल पैलेस हॉटेलचा रस्ता वाहनांनी भरून गेला. परिस्थिती आटोक्याबाहेर गेल्याचे लक्षात आल्यावर वाहतूक पोलिसांची धावपळ उडाली. वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी अतिरिक्त कर्मचारी तैनात केली.
तरीही रात्री ११ वाजेपर्यंत कमी अधिक प्रमाणात जाम होताच.
याचौकातून येत होते वाहने: सिल्लेखाना चौक, अजबनगर, शिवाजी हायस्कूल समोरील रस्त्यावरुन, अभिनय अभिनित टॉकीजकडून येणाऱ्या-जाणाऱ्या रस्त्यावरुन, त्याच्या समोरच्या चौकातून जालना रोडची वळविण्यात आलेली वाहतूक, जुन्या मोंढ्याकडून जालना रोडवर येणारी वाहने, कैलास नगर कडून येणारी जाणारी वाहने, मोंढा नाक्याहून मोंढ्याकडे शिवाजी हायस्कूलकडे जाणारी वाहने आणि अमरप्रित हॉटेल चौकातून येणारी जाणारी वाहने छोट्या रस्त्यावर येत होती. त्यामुळे सिल्लेखानापर्यंत याचा परिणाम होत होता.
एसटीबस, ट्रैक्टर, रिक्षा: शहरातील मुख्य वाहिनी असलेल्या जालना रोडवरुनच जालना, बीडकडे नगर, पुणे, नाशिक, कन्नडकडे एसटी बस जात असतात. तसेच खाजगी बस वाहनांनाही हाच एकमेव पर्याय आहे. त्यात ट्रॅक्टरही याच रस्त्यावरुन जात असल्याने सम्राट अशोक चौक (मोंढा) रस्त्यावर एकच गर्दी झाली होती. वाहने १५ मिनिटांनी फूटभर वेगाने पुढे सरकत होती.
नशिब अडकलो नाही पण...: ट्रैफिक जामचा सर्वाधिक फटका अँब्युलन्सने जाणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना होतो. सोमवारी जालना रोडवर झालेल्या गोंधळात सावजी हॉस्पिटलसमोर सकाळी ११ वाजून मिनिटांनी दोन अँब्युलन्स अडकल्या होत्या. मात्र, काही वाहनचालकांनी सुज्ञपणा दाखवत वाहने बाजूला घेत त्यांना वाट मोकळी करून दिली. परंतु, जालना रोडवर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. त्यावर मार्ग काढला पाहिजे, असे अँब्युलन्सचालकांचे म्हणणे होते. समाधान रुग्णसेवेचे समाधान पाटील म्हणाले की, जालना रोडवरून रुग्णांना घेऊन जाणे धोकादायक झाले आहे. मोकळ सर्व्हिसेसचे कमलाकर मोकळ म्हणाले की, रस्त्यांची दुरवस्था, त्यातच ट्रैफिक जामचे संकट असते. बऱ्याचवेळा रुग्णांच्या नातेवाईकांकडून आम्हाला शिवीगाळही होते. महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी समन्वय राखला तर असा जाम होणारच नाही. मोंढा नाका येथे कायम वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी अपेक्षा २४ तास अँब्युलन्सचे मेजर शेख शरीफ यांनी व्यक्त केली. चाचू अँब्युलन्स सर्व्हिसचे बाळू राठोड यांच्या मते वाहतुकीच्या कोंडीला नागरिकही तेवढेच जबाबदार आहेत.

मोंढा नाका उड्डाणपुलाजवळ जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असल्याने दिवसभर वाहतूक खोळंबली होती. रात्री उशिरापर्यंतही वाहतूक खोळंबलेलीच होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा या बातमी संबंधित आणखी...