औरंगाबाद - दुचाकी स्वारांच्या सुरक्षेसाठी सुरू असलेली हेल्मेटसक्ती पोलिसांच्या अरेरावी आणि दंडेलशाहीमुळे नागरिकांच्या जिवावर बेतत असल्याचे प्रकार शहरात वाढत आहेत. हेल्मेट घालता दुचाकी चालवणाऱ्या तरुणाची दुचाकी पोलिसांनी ओढल्यामुळे खाली पडून तरुण गंभीर जखमी झाला. दीपक रामदास गायकवाड (२८) असे त्याचे नाव असून चार दिवसांपासून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी (११ जून) दीपक त्याचा मित्र गणेश बन्सीलालनगर येथून क्रांती चौकाकडे जात होते. क्रांती चौकात दोन वाहतूक पोलिस हेल्मेटसक्तीची मोहीम राबवत होते. दीपकने हेल्मेट घातले नव्हते, हे पाहताच दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी अचानक त्यांच्यावर झडप घातली. दीपक दुचाकी बाजूला घेत असतानाच एका कर्मचाऱ्याने मागे बसलेल्या गणेशच्या पाठीत काठीने जोरदार वार केला, तर दुसऱ्याने दुचाकी ओढली. यामुळे दीपकचा तोल गेला आणि त्याच्या उजव्या पायावर दुचाकी पडली. यात त्याच्या पायाची दोन हाडे मोडली. एका हाडाचा अक्षरश: चुरा झाला असून एक हाड जोडण्यासाठी पायात रॉड टाकून ऑपरेशन करावे लागेल, असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. दीपकचे वडील शेतकरी असून तो कॉम्प्युटर दुरुस्तीचे काम करतो. दवाखान्यात भरती असल्यामुळे उत्पन्नही बंद झाले आहे. पाय मोडल्याने अपंगत्व येऊ नये, अशी प्रार्थना गायकवाड कुटुंब देवाकडे करत आहे. दरम्यान, पोलिसांनी दीपकला दवाखान्यात दाखल करण्याची माणुसकीही दाखवली नाही.
न्याय मिळावा ही अपेक्षा
हेल्मेटसक्तीहवीच असे गायकवाड कुटुंबाचे म्हणणे आहे. मात्र, ती अशा प्रकारे जिवावर बेतणारी नसावी. पोलिसांमुळे मुलाचा पाय तुटला. चार दिवसांत २५ हजार रुपये खर्च झाले. काही पोलिस माफी मागण्यास आले होते. मात्र, त्यातही एक अधिकारी अरेरावी करत होता. घटना घडली तेव्हा भोसले जाधव नावाचे कर्मचारी असल्याचे दीपकने सांगितले. यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी पोलिस आयुक्तांना अर्ज दिला आहे. आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी गायकवाड कुटुंबीयांनी केली आहे.