आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत केवळ 500 रुपयांच्या लोभापोटी पोलिसांचे इमान गहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहर वाहतूक पोलिस आणि आरटीओ अधिकार्‍यांसोबत हप्ताखोरीचे जाळे घट्ट विणून सुमारे 15 हजार रिक्षाचालक दररोज अवैध प्रवासी वाहतूक करत आहेत. परवाना नसल्यास 2500 रुपये दंड आकारणी केली जाते. मात्र, हे टाळायचे असल्यास पोलिसांना 500 रुपयांचा हप्ता देऊन बला टाळली जाते. हे राजरोसपणे सुरू आहे. प्रत्येक आठवड्याला रिक्षाचालकाच्या हप्त्यांची नोंद करणारी बेकायदेशीर यंत्रणा पोलिसांनी उभारली आहे. परवाना, बॅज, ड्रेससाठी हप्त्याचे भावही निश्चित झाले आहेत. त्यातून दर आठवड्याला किमान 50 हजारांची कमाई होते. या हप्तेखोरीचा मीटरवर रिक्षा चालवणार्‍यांनाही त्रास होत आहे. हप्त्याचा व्यवहार कसा होतो, हे रिक्षाचालकांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. मात्र, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कारवाई होत नाही, असे सांगत गणेशोत्सवानंतर व्यापक मोहीम हाती घेणार असल्याचा दावा केला. पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी वाहतूक पोलिस कोणतीही हप्तेखोरी करत नाहीत, असा प्रतिदावा केला.

केवळ 500 रुपयांच्या लोभापोटी पोलिसांचे इमान गहाण
''अवैध प्रवासी वाहतूक करताना अडीच हजार रुपयांचा दंड चुकवायचा असेल तर वाहतूक पोलिसांना 500 रुपये द्या आणि बला टाळा. त्यानंतर तुम्ही कितीही प्रवासी कोंबा. तुमचा धंदा बिनबोभाट चालेल. शहरात सध्या तरी पोलिस-रिक्षाचालकांनी संगनमताने हे अवैध सूत्र तयार केले आहे. गणेशोत्सवात प्रवाशांची रेलचेल वाढल्याने अवैध वाहतुकीला ऊत आला आहे. रिक्षाचालकांनी पाचशे रुपयांत शोधलेल्या नामी शकलीचा छडा ‘दिव्य मराठी’ने लावला. चिरीमिरीतून पोलिस आणि रिक्षाचालक 40 हजार प्रवाशांच्या जिवांचा कसा सौदा करतात याचा आज प्रत्यय आला.''

इलेक्ट्रॉनिक मीटरवरच रिक्षा चालवण्याचे राज्य शासनाचे फर्मान आहे. जून, जुलै महिन्यात मोहीम राबवण्यात आली. तीन हजारांपेक्षा अधिक रिक्षाचालकांनी मीटर बसवून घेतले. मात्र, त्याचा फारसा फायदा प्रवाशांना झालेला नाही. एसटी महामंडळाची बस व्यवस्था अतिशय तोकडी आणि तुरळक भागात असल्याने दररोज 40 हजारांपेक्षा अधिक लोकांना रिक्षाशिवाय पर्याय नाही. मीटरविना धावणार्‍या रिक्षांतून त्यांना प्रवास करावा लागत आहे. अनेक चालक तर मीटर बंद आहे, भाडे ठरवून बसा, असेच सांगतात. गजानन महाराज चौक, उस्मानपुरा, क्रांती चौक, पदमपुरा, रेल्वेस्टेशन, टीव्ही सेंटर चौक, चिकलठाणा येथून शेअर रिक्षा आहेत. त्यातही प्रवाशांची कोंबाकोंबी केली जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 70 टक्के रिक्षा स्क्रॅप आहेत. त्यांची 15 वर्षांची र्मयादा संपलेली असते, तरीही त्या बिनधास्तपणे धावत आहेत. चालक, मालकांवर क्वचित फुटकळ कारवाईपलीकडे काहीही होत नाही.

अवैध वाहतूक करीत कोंबाकोंबी करणार्‍या हजारो रिक्षा आहेत. बहुतांश रिक्षामालक भाड्याने चालवण्यास देतात. लालबावटा, रिक्षाचालक सेना, मजदूर संघ रिक्षा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी या यंत्रणेची माहिती नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि आरटीओ प्रशासनाने मनावर घेतल्यास आठ दिवसांत स्क्रॅप रिक्षा बंद होतील आणि मीटरवरील रिक्षाच धावतील, असेही त्यांनी सांगितले.

कोठून येतात स्क्रॅप रिक्षा? : मुंबईची उपनगरे, नवी मुंबई, ठाणे, वसई, नाशिक येथून हद्दपार झालेल्या 90 टक्के रिक्षा औरंगाबादेत दाखल झाल्या आहेत. दहा टक्के औरंगाबाद, जळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आल्या आहेत. दहा ते 25 हजार रुपयांत रिक्षा उपलब्ध होतात. नव्या रिक्षाची किंमत एक लाख 30 हजार रुपये आहे.

कोठून धावतात सर्वाधिक स्क्रॅप रिक्षा ? : बाबा पेट्रोल पंप, औरंगपुरा, सेव्हन हिल्स, हर्सूल टी पॉइंट, गजानन महाराज मंदिर चौक, सिडको बसस्टँड, रेल्वेस्टेशन, टीव्ही सेंटर या भागात परवाने नसलेल्या आणि स्कॅ्रप रिक्षा सर्वाधिक चालतात आणि याच ठिकाणी सर्वाधिक वाहतूक पोलिस तैनात आहेत. तीन आसनांची क्षमता असली तरी सहा प्रवासी कोंबले जातात. गेल्या दहा महिन्यांत म्हणजे ऑक्टोबर 2012 ते जुलै 2013 कालावधीत रिक्षांचे छोटे मोठे सुमारे 194 अपघात झाले आहेत. त्यात 60 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

90 टक्के रिक्षाचालक बाहेरगावचे : रिक्षा संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, परवाना नसलेल्या रिक्षा चालवणारे 90 टक्के चालक लातूर, जालना, बुलडाणा जिल्ह्यांतील आहेत. रोजगाराच्या शोधात ते येथे आले आहेत. काही जण दिवसा तीन-चार तास रिक्षा, तर रात्री हॉटेलमध्ये वेटर म्हणूनही काम करत आहेत.

काय होते कमाई ? : स्क्रॅप रिक्षा चालवणार्‍याचा रोजचा धंदा 600 ते 700 रुपयांचा असतो. त्यातील 300 रुपये तो रिक्षामालकाला भाड्यापोटी देत आहे. पेट्रोल आणि किरकोळ दुरुस्तीचा खर्चही चालकालाच करावा लागत आहे.

असे आहे हप्त्याचे गणित
कशासाठी नियमानुसार दंड पोलिस घेतात
परवाना नाही 2500 रुपये 500 रुपये
लायसन्स नाही 1200 रुपये दंड 300 रुपये
बॅज नाही 400 रुपये 100 रुपये
गणवेश नाही 100 रुपये 50 रुपये
स्क्रॅप रिक्षा जप्ती 500 रुपये
(मुंबई मोटार अधिनियम कायद्याच्या कलम 130 ते 177 नुसार दंडवसुलीचे अधिकार पोलिस, आरटीओंना आहेत.)

हप्त्याचा मेसेज
शहरातील चिकलठाणा ते बाबा पेट्रोल पंप रस्त्यासह इतर रस्त्यांवर चालणार्‍या रिक्षांचा हप्ता सकाळी पहिल्या ट्रिपलाच जमा करावा लागतो. त्याचा मेसेज वाहतूक पोलिस सर्व संबंधित सहकार्‍यांना पाठवत असतो.

अशी होते सौदेबाजी
दि. 9 सप्टेंबर 2013. स्थळ : बाबा पेट्रोल पंप. वेळ : दुपारी 2
पोलिस : परमिट, लायसन्स, कागदपत्र दाखव.
रिक्षाचालक : माफ करा साहेब, जाऊ द्या.
हवालदार : चल, गाडी लाव स्टेशनला.
रिक्षाचालक : साहेब, मला जाऊ द्या.
हवालदार : कागदपत्रे नाहीत, लायसन्स नाही, परमिट नाही. तीन हजार रुपयांची पावती लागेल.
रिक्षाचालक : साहेब, आताच बाहेर पडलो. पहिलीच ट्रिप होती.
(मग हवालदार रिक्षात बसतो. रिक्षा होलीक्रॉस शाळेलगतच्या गल्लीत थांबते.)
हवालदार : आता सांग काय करायचे ते.
रिक्षाचालक : साहेब, फक्त 100 रुपये आहेत खिशात.
हवालदार : तीन हजारांचा फाइन आहे.
रिक्षाचालक : 500 रुपये देतो.
हवालदार : ठीक आहे. पुढच्या वेळी आधीच जमा करत जा.
(शहरात हप्ता देणारे हजारो रिक्षाचालक आहेत. त्यामुळे या रिक्षाचालकाचे नाव उघड केलेले नाही.)

हप्तेखोरी होत नाही. तशा कुणाच्या तक्रारी असतील तर चौकशी केली जाईल. स्क्रॅप, विनापरवाना (परमिट) रिक्षाचालकांची यादी प्रादेशिक परिवहन विभागाला वारंवार दिली जाते. मात्र, त्यांच्याकडून कारवाईला विलंब होतो आहे.
-सोमनाथ घार्गे, पोलिस उपायुक्त