आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Traffic Police Save Man Life And Money In Aurangabad

लेखापालाच्या जिवासह साडेचार लाख रुपयेही हवालदाराने वाचवले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘खाकी म्हणजे दागी’ असा सर्वसाधारण समज आहे. चित्रपटातूनही ‘दागदार खाकी’चे प्रसंग रंगवून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या जातात. मात्र, खाकीतील माणुसकीचा प्रत्यय गुरुवारी (19 सप्टेंबर) औरंगाबादकरांनी अनुभवला. ‘फिट्स’चा (अपस्मार) झटका येऊन कोसळलेल्या अनोळखी व्यक्तीचे वाहतूक शाखेचे हवालदार गणेश कोरडे याने प्राण तर वाचवलेच, त्याचबरोबर त्याच्याजवळील साडेचार लाखांची रोकडही परत केली. एरवी टीकेचे लक्ष्य ठरणार्‍या पोलिसांचे औदार्य बघून बघ्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

स्थळ : स्टेट बँक, क्रांती चौक
वेळ : दुपारी 2.40 मिनिटांची
वाळूज येथील आर. के. ट्रेडर्स कंपनीत लेखापाल म्हणून काम करणार्‍या मोहंमद नवाज सिद्दिकी यांनी एसएफएस शाळेसमोरील इंडियन ओव्हरसीज बँकेतून पाच लाख रुपयांची रोकड काढली. त्यातील पन्नास हजार रुपये एका सहकार्‍याकडे देऊन हीरो होंडा स्प्लेंडर या दुचाकीवरून सिद्दिकी वाळूजच्या दिशेने अडीच वाजता मार्गस्थ झाले. क्रांती चौक येथील स्टेट बँकेच्या शेजारी सिद्दिकी यांना अपस्माराचे (फिट्स) झटके आले. त्या वेळी भरधाव वेगाने जाणार्‍या दुचाकीवरून ते खाली कोसळले आणि त्यांच्याकडील हजारच्या नोटांच्या बंडलांपैकी एक लाखाचे एक बंडल अस्ताव्यस्त पसरले. त्या ठिकाणच्या एका सतर्क नागरिकाने महर्षी दयानंद चौकात (अमरप्रीत) कर्तव्य बजावणारे वाहतूक शाखेचे हवालदार गणेश कोरडे यांना ही माहिती दिली. सहकारी हवालदार अभय भालेरावला चौक सांभाळण्याची विनंती करून कोरडे यांनी त्वरित घटनास्थळ गाठले. प्रथम सिद्दिकीला वैद्यकीय उपचारासाठी क्रांती चौकच्या मोबाइल टूमधून घाटीत रवाना करण्याचे त्याने प्रसंगावधान दाखवले. त्यानंतर रस्त्यावर विखुरलेल्या हजार रुपयांच्या नोटांना तीनशे लोकांच्या गराड्यातून स्वत:च जमा केले. त्याशिवाय रुग्णाच्या हातातील कॅरिबॅगमधील साडेतीन लाख आणि जमा केलेली एक लाख रुपयांची रोकड उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक भारत काकडे यांच्या स्वाधीन केली.

रक्कम केली मालकाच्या स्वाधीन
कोरडे आणि सेवानिवृत्त जमादार विश्वनाथ भोळे यांनी दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान काकडे यांच्याकडे दिली. ही रक्कम सायंकाळी सहाच्या सुमारास आर. के. ट्रेडर्सच्या मालकाकडे देऊन पोलिसांनी ‘दागदार खाकी’चा समज चुकीचा असल्याचे सिद्ध करत माणुसकीचा प्रत्यय दिला.