आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहतूक कोंडीने व्यापारी अन् ग्राहकही त्रस्त, अरुंद रस्ता, पार्किंगचा प्रश्न, हातगाड्यांचा ताप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गुलमंडी,टिळकपथ ही शहरातील सर्वात जुनी आणि गजबलेली बाजारपेठ. या परिसरात वाहनांची नेहमीच प्रचंड वर्दळ असते. वन वे असतानाही होणारी दुहेरी वाहतूक, दुकानांसमोर लागणारी वाहने, त्यातच हातगाड्या आणि फेरीवाल्यांची गर्दी. यामुळे येथे सगळीकडे गाड्यांचीच रेलचेल दिसते. परिणामी वाहतुकीची कोंडी ठरलेली. ग्राहकांबरोबरच येथील व्यापारीही यामुळे त्रस्त झाले आहेत. या भागात खरेदीसाठी जावे की नाही, असा विचार आता ग्राहक करत आहेत. तर दुसरीकडे पोलिसांकडून कारवाई करण्याबाबत पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप येथील व्यापारी करत आहेत.
शहर वाढले, तशी वाहनेही खूप वाढली. मुळातच अरुंद रस्ते असलेल्या या परिसरात पार्किंगसाठी जागा अपुरी पडू लागली. त्यावर उपाययोजना करण्यासाठी पी-वन, पी-टूची पद्धत सुरू करण्यात आली; पण तरीही येथील कोंडी काही संपली नाही. त्यामुळे पार्किंगची डोकेदुखी काही संपेना.

घरे इथेच, गाड्या कोठे लावाव्यात?
कित्येकवर्षांपासून या भागात अनेक व्यापाऱ्यांची घरे आहेत. काहींची तर पिढीजात निवासस्थाने आहेत. अनेकांचे वर घर आणि खाली प्रतिष्ठान असा प्रकार आहे. पूर्वी येथे वन वे किंवा नो पार्किंग काहीच नव्हते. मात्र, आता गरजेनुसार महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी या गोष्टींचे नियम केले आहेत. याबाबत आमची काहीच हरकत नाही; पण आता आमची दुकाने घरेही इथेच आहेत, आम्ही आमच्या गाड्या कोठे लावाव्यात हे पोलिसांनी सांगावे, असा सवाल व्यापारी करत आहेत. विशेष म्हणजे टिळकपथवर पार्किंगच्या तीन-तीन लाइन लागतात, तेथे कारवाई होत नाही. मात्र, आमच्याकडे वाहतुकीला कुठलाही अडथळा होणार नाही याची काळजी घेत आत लावलेल्या गाड्यांनाही जॅमर लावले जाते. अनेक वेळा दुचाकी उचलून नेल्या जातात, असा आरोप गोमटेश मार्केट येथील व्यापारी करत आहेत.

वाहतूक पोलिसांचे आवाहन
सध्या शहरात सम-विषम तारखेनुसार पी-१, पी-२ प्रमाणे पार्किंग सुरू करण्यात आली आहे. शहरातील, विशेषत: पैठण गेट, टिळकपथ, गुलमंडी परिसरातील व्यापारी दिवसभर आपल्या दुकानासमोरच्या जागेत स्वत:च्या कर्मचाऱ्यांच्याच गाड्या लावतात. त्यामुळे ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर उभ्या राहतात. परिणामी, कारवाईलाही त्यांनाच सामोरे जावे लागते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपली कर्मचाऱ्यांची वाहने मनपाच्या पे अँड पार्कमध्ये लावावीत. तसेच एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जाण्यासाठी नो एंट्री किंवा राँग साइडचा अवलंब करू नये, असे आवाहन सहायक आयुक्त सी. डी. शेवगण यांनी केले आहे.

साऱ्यांनीच घ्यावा यांचा आदर्श
टिळकपथ येथील कपड्यांचे व्यापारी अनिल अग्रवाल यांच्याकडे २५ ते ३० कर्मचारी असून त्यापैकी २० पेक्षा जास्त लोकांकडे दुचाकी आहेत. पण त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वाहने दुकानासमोर लावता मनपाच्या ‘पे अँड पार्क’मध्ये लावण्याची सक्त ताकीद दिलेली आहे. कामगारांना ते पार्किंगचे अर्धे पैसेही देतात. दुकानासमोरील पार्किंग ही केवळ ग्राहकांसाठी राखीव ठेवत असून पी-१ आणि पी-२ नुसार पार्किंगचा फलकही लावतात. यामुळे वाहतूक कोंडीही होत नाही आणि त्यांच्या ग्राहकांच्या वाहनांवर कारवाई करण्याची वेळ येत नाही. ते म्हणतात, मनपा आणि पोलिसांनी हा वन वे केलेला आहे. शिवाय पार्किंगसाठी पी-१, पी-२ चा नियम लावलेला आहे. वाहनधारकांना शिस्त लागण्यासाठी हे करणे योग्यच आहे. मात्र, येथील हातगाड्यांमुळे समस्या निर्माण होतात, त्याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.

हातगाड्या अन् फेरीवाल्यांचा त्रास दूर व्हावा
पोलिस अनेकदा पार्किंगमधूनही गाड्या उचलून नेतात. पोलिस स्टेशनची पायरी चढण्याची वेळ येऊ नये म्हणून कोणी त्यांच्याशी वाद घालत नाही. अनेकदा महिलांच्या गाड्या उचलतात, त्यांना छावणी पोलिस स्टेशन माहिती नसते. त्या लगेच रडू लागतात, तरीही पोलिस माणुसकी दाखवता अवास्तव कारवाई करतात. -सय्यद शाहेद

टिळक पथ भागात सर्वात मोठी आणि गंभीर समस्या आहे अनधिकृत हातगाड्या आणि फेरीवाल्यांची. गेल्या वर्षी उद््भवलेला दंगाही हातगाडीवाल्यांमुळेच झाला होता. येथे ५० ते ६० अनधिकृत हातगाड्या आहेत, त्यांच्यावर नियंत्रण घातल्यास वाहतुकीचा अडथळा बऱ्यापैकी कमी होऊ शकतो. -आनंद परसवाणी

वन वेअसताना सर्रास राँग साइड जाणाऱ्या रिक्षा आणि दुचाकींवर कुठलीही कारवाई होत नाही. रस्त्यात उभ्या राहणाऱ्या रिक्षांवरही कारवाई केली जात नाही; पण टार्गेट पूर्ण करण्याच्या उद्देशाने आमच्या ग्राहकांच्या गाड्यांना जॅमर लावण्याचे काम पोलिस आवर्जून करतात. यामुळे आम्ही त्रस्त आहोत. -महावीर जैन

आमच्या गोमटेशमार्केटमध्ये कोठेही नो पार्किंगचे फलक नाहीत. त्यामुळे समस्या निर्माण होतात. यावर मात्र ही मनपाची जबाबदारी असल्याचे सांगितले जाते. वाहतूक पोलिसांकडून जाणीवपूर्वक आम्हा व्यापाऱ्यांना टार्गेट केले जाते. परिणामी व्यवसायावर विपरीत परिणाम होतो आहे. -दीपक बलदवाँ

रस्त्यावर वाहतुकीलाअडथळा निर्माण करणाऱ्यांवरील कारवाईला आमचा विरोध नाही♣; पण आमच्या हद्दीतील गाड्याही उचलल्या जातात. शिवाय पैठणगेटला वाहतूक शाखेचे कार्यालय असताना छावणीमध्ये गाड्या का नेल्या जातात? यामुळे मानसिक त्रासासह वाहनधारकांना रिक्षा भाड्याचा भुर्दंड सहन करावा लागतो. -अनिल संदाणी

आमचे घरे आणि दुकाने इथेच असून या खूप जुन्या इमारती आहेत. आम्ही आमच्या गाड्या कोठे लावाव्यात. पी-१, पी-२ चा नियम असतानाही आतील गाड्या उचलून नेल्या जातात. मात्र, टिळकपथवर तीन-तीन रो लागतात, तरीही त्यावर कारवाई केली जात नाही. हा दुजाभाव का केला जातोा? -गोपाल दधीच
हातगाड्यांनी वाढवली अडचण
टिळकपथ बाजापेठेतील रोडवर जवळपास ५० ते ६० हातगाड्या लागतात. पोलिस एकीकडे पार्किंगच्या नावावर रस्त्यावर आलेल्या म्हणजेच वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या आतील वाहनांवरही कारवाई करत आहेत; पण हे करताना भररस्त्यावर हातगाड्या लावून वाहतुकीची कोंडी करणाऱ्यांवर कोणतीच कारवाई केली जात नाही. विशेष म्हणजे येथे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीला आणि त्यातून होणाऱ्या वादाला प्रामुख्याने फेरीवाले आणि हातगाडीवालेच जबाबदार आहेत. अगोदर त्यांच्यावर कारवाई करावी. वाटल्यास त्यांना वेगळ्या ठिकाणी जागा द्यावी. तरच ही कोंडी काही प्रमाणात फुटण्यास मदत होईल, अन्यथा हा त्रास दिवसेंदिवस आणखी वाढत जाईल, असेही येथील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...